Subhash Deshmukh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Subhash Deshmukh : भाजप नेते सुभाष देशमुखांनी उडवली ‘दक्षिण’मधील काँग्रेस इच्छुकांची खिल्ली; ‘पावसाळ्यातील छत्र्याप्रमाणे...’

Vijaykumar Dudhale

Solapur, 15 August : पावसाळ्यात ज्या प्रमाणे छत्र्या उगवतात, त्याप्रमाणे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे, अशा शब्दांत माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेसमधील इच्छुकांची खिल्ली उडवली.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातून (South Solapur Constituency) निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसकडून (Congress) जवळपास वीस लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून जवळपास दहा हजाराचे मताधिक्य प्रणिती शिंदे यांना मिळाले आहे, त्यामुळे दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची बाहुगर्दी दिसून येत आहे.

याबाबत सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलताना माजी मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, पावसाळा आला जशा छत्र्या उगवतात, त्या प्रमाणे दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसकडे गर्दी दिसून येत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला आमदार व्हावं असं वाटतं. ज्याला आमदार व्हावं, असं वाटतं, तो इच्छुक राहणारच. ह्याला तर लोकशाही म्हणतात. सगळ्यांना निवडणूक लढविण्यासाठी स्वातंत्र आहे, कोणालाही बंधन नाही.

काँग्रेसकडे जवळपास सतरा ते अठरा लोक दिसत आहेत. बहुधा त्यांच्याकडे जरा जास्त पाऊस पडलेला असावा, त्यामुळे त्यांच्याकडे इच्छूक जास्त दिसून येत असावेत, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

विकासकामांवरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर काहीसे चिडत सुभाष देशमुखांनी उत्तर दिले. मी कामातून दाखवून देत आहे. ज्यांना ज्यांना डोळे आहेत, त्यांनी 2004 ते 2014 आणि 2014 आणि 2024 या काळात झालेला विकास उघडे डोळे ठेवून बघावं, असे आवाहन सुभाष देशमुखांनी टीकाकरांना दिले.

लोकसभा निवडणुकीची समीकरणं वेगळी असतात. त्या वेळची परिस्थिती वेगळी असते. स्थानिक काही मुद्दे तसेच देशपातळीवरील काही प्रश्न असतात. त्यामुळे असं होत असतं, असे सांगून लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मताधिक्याबाबत देशमुख यांनी भाष्य केले.

लोकसभा निवडणुकीत 'एनडीए'मधील भारतीय जनता पक्षाचे 240 खासदार निवडून आले आहेत. इंडिया आघाडीतील सर्व पक्षाचे मिळून 240 खासदार नाही तरी जल्लोष केला जात आहे. सर्वाधिक जल्लोष हा काँग्रेसकडे आणि त्यांचे खासदार शंभरसुद्धा नाहीत, असा टोलाही त्यांनी काँग्रेस पक्षाला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT