Nitesh Rane On Ajit Pawar .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitesh Rane : भाजपच्या राणेंनी राष्ट्रवादीचा इशारा धुडकावला? म्हणाले,'अजितदादांना कुठे तक्रार करायची, ती करू द्या...'

Deepak Kulkarni

Sangli News : महायुतीत एकीकडे एकमेकांवर जागा वाटपावरुन कुरघोडीचं राजकारण सुरू आहे.त्यातच विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच महायुतीतील शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून एकापाठोपाठ वादग्रस्त विधानांचा सिलसिला सुरू आहे.यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधी मिळत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत या वक्तव्यांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

याचमुळे महायुतीतल घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आक्रमक पाऊल उचलत वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांची थेट दिल्ली दरबारी तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane), शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, संजय गायकवाड, भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यासह अनेक नेतेंमंडळींनी विरोधकांवर टीकेची झोड उठवतानाच गेल्या काही दिवसांत आपल्या वादग्रस्त विधानं आणि आक्रमक भूमिकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडवून दिला आहे.

त्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यांमुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात कमालीचं नाराजीचं वातावरण पसरलं असल्याची माहिती समोर येत आहे.अजितदादा गट तक्रार करणार असल्याच्या चर्चांवर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत प्रतिक्रिया दिली आहे.

सांगलीच्या बत्तीस शिराळा येथे हिंदू जनआक्रोश मोर्चाला भाजप आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली.यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तक्रार करण्याच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिले.ते म्हणाले, अजितदादांना (Ajit Pawar) कुठे तक्रार करायची ती करू द्या.मी माझ्या हिंदुत्वाशी अजिबात तडजोड करणार नाही, असं राणे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

अजितदादांनी विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीचा एकदा तरी निषेध करायला हवा होता. मग अशी वेळ आली नसती. मी माझ्या धर्माचे काम करतोय. हिंदू म्हणून मी लढतोय, असंही आमदार राणे यावेळी म्हणाले.

सर्वधर्म समभाव आम्हीच जपायचा का?

भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, हिंदू समाजाला आज आव्हान दिले जात आहे.कमी लेखले जात आहे.हिंदू देवतांबद्दल काहीही बोललं जातं आहे. सर्वधर्म समभाव केवळ हिंदूंनाच सांगितला जातोय. हिंदु समाजानं सगळ्यांचा ठेका घेतला आहे का? हिंदू राष्ट्रात सर्वधर्म समभाव आम्हीच जपायचा का? विसर्जनावेळी दगडफेक करतात. इथून पुढे तेही मिरवणुका शांतपणे काढू शकणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं आहे. सगळ्यांना समान कायदा लागू आहे.पण तरीही आम्हालाच सर्व गोष्टींची सक्ती केली जाते. सहिष्णूता आम्हालाच शिकवली सांगितली जाते. आम्हीच कायम संयम राखायचा.आम्हीच अन्याय सहन करायचा.हे योग्य नाही.हे कुठवर चालणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अजितदादांनी वादग्रस्त विधानं करणार्‍यांना झापलं

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महायुतीतील वादग्रेस विधानं करणार्‍यांची कानउघडणी केली.ते म्हणाले,वेडेवाकडे विधान करुन कुठेही मुख्यमंत्र्यांना,महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणू नये.ठीक आहे, राग येतो.आम्हालाही येतो.पण राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते?", असे खडेबोल अजित पवारांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT