Ranjitsinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ranjitsinh Mohite Patil : भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी महाआघाडीच्या व्यासपीठावर हजेरी लावली अन्‌ भाषणही ठोकले!

Mahavikas Aghadi : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मोहिते पाटील यांनी आज अकलूजमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 29 September : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती ही सर्वाधिक लक्षवेधी ठरली. अकलूजमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रणजितदादा येणार की नाही, याची प्रचंड उत्सुकता सोलापूर जिल्ह्यात होती.

कारण लोकसभा निवडणुकीत हे धैर्यशील यांच्या प्रचारापासून ते दूर होते, ती उत्सुकता संपवत आज रणजितसिंह मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थिती लावत धडाकेबाज भाषण केले.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलत तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट दिले होते. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली. धैर्यशील यांनी भाजपचे उमेदवार निंबाळकर यांचा पराभव करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी जेव्हा भाजप सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी समारे न येता पडद्यामागून सूत्रे हलवली होती. मात्र, त्यांनी प्रचाराच्या व्यासपीठावर कोठेही हजेरी लावली नव्हती. दुसरीकडे भाजपचे आमदार असूनही रणजितदादांनी निंबाळकरांच्या प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

अकलूजमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा असूनही रणजितसिंह मोहिते पाटील हे त्या सभेपासून दूरच राहिले होते. मात्र, आपल्या पक्षाचा सर्वोच्च नेता आपल्या गावी येत आहेत, हे लक्षात घेऊन रणजितसिंह मोहिते पाटील हे फडणवीसांच्या स्वागताला गेले होते. मात्र, त्यांचे स्वागत न स्वीकारता फडणवीस हे पुढे निघून गेले होते. तेव्हापासून रणजितदादा हे भाजप कधी सोडणार, याची चर्चा अनेक दिवसांपासून होत होती.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मोहिते पाटील यांनी आज अकलूजमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

रणजितदादांनी व्यासपीठावर नुसती हजेरीच लावली नाही तर भाषणही ठोकले. विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्यापासून विलासराव देशमुख यांच्यापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने पक्षविरहीत काम केले याचे दाखलेही दिले. सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या कामांचा गौरव करताना अप्रत्यक्षपणे सध्या सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणावरही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT