Madha Politics : ...नाही तर माढा अन्‌ करमाळ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू; उमेदवारीसाठी साठे गट आक्रमक

Mahavikas Aghadi : माढ्यातून मीनल साठे यांना उमेदवारी मिळाली नाही तर छत्तीस गावांतील कार्यकर्ते हे करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार नाहीत, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
Meenal Sathe
Meenal SatheSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 September : माढ्याच्या नगराध्यक्षा तथा काँग्रेस नेत्या ॲड मीनल साठे यांना माढा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात यावी; अन्यथा करमाळ्यात आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार नाही. महाविकास आघाडीचे माढा आणि करमाळा या दोन्ही ठिकाणचे उमेदवार पाडू, असा खणखणीत इशारा माजी आमदार धनाजीराव साठे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीपुढे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघ (Madha Assembly Constituency) हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून गेल्या पाच निवडणुका आमदार बबनराव शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) चिन्हावर लढवल्या आहेत. माढ्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीतही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत गेले आहेत. सध्या माढ्यात आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराची महाविकास आघाडीला गरज आहे. त्या दृष्टीने त्यांच्याकडून विशेषतः शरद पवार गटाकडून तयारी करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेसच्या माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे (Meenal Sathe) यांनी या मतदारसंघावर दावा केला असून ही जागा काँग्रेसच्या साठे गटासाठी सोडावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोरदारपणे होत आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावांतील साठे गटाच्या कार्यकर्त्यांची कुर्डूवाडी येथे बैठक झाली. त्या बैठकीत ॲड. मीनल साठे यांच्यासाठी माढा विधानसभा मतदारसंघ सोडावा; अन्यथा करमाळ्यातील छत्तीस गावांतील साठे गटाचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडीला मदत करणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे .

Meenal Sathe
Akluj Melava :लोकसभेप्रमाणे विधानसभेचीही रणनीती अकलूजमध्येच ठरणार; मातब्बर चार नेते येणार एकत्र!

करमाळा विधानसभेला जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावांमध्ये माजी आमदार धनाजीराव साठे यांचा गट कार्यरत आहे. या छत्तीसमधील बहुतांश गावांमध्ये धनाजीराव साठे यांचे वर्चस्व आहे, ही 36 गावे जेव्हापासून करमाळा मतदारसंघाला जोडण्यात आली आहेत, तेव्हापासून धनाजीराव साठे यांच्या आदेशानुसार साठे गट हा महाविकास आघाडीचे काम करत आहे.

कुर्डूवाडी येथील साठे गटाच्या बैठकीत महाविकास आघाडीबद्दल संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. त्या बैठकीत माढ्याची जागा मीनल साठे यांच्यासाठी सोडण्यात यावी, त्यादृष्टीने वरिष्ठ नेतेमंडळींनी आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा. माढ्यातून मीनल साठे यांना उमेदवारी मिळाली नाही तर छत्तीस गावांतील कार्यकर्ते हे करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार नाहीत, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.

Meenal Sathe
Karmala Politics : संजय शिंदेंपासून जयवंतराव जगताप दुरावलेत का? निमंत्रण असूनही अजितदादांच्या दौऱ्याला दांडी

साठे गटाचे प्रमुख कार्यकर्ते ॲड. बी. डी. पाटील यांनी माढ्यातून मीनल साठे यांना उमेदवारी दिली नाही तर महाविकास आघाडीचे माढा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार आम्ही पाडू, असा इशारा दिला आहे, त्यामुळे माढा मतदारसंघात उमेदवारीसाठी साठे गट प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com