Vishal Patil and MP Sanjay Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics : सांगलीच्या दोन पाटलांत जुंपली; राष्ट्रवादीच्या स्टेजवरून विशाल फटकेबाजी

Ganesh Thombare

राहुल गडकर

Sangli News: लोकसभेसाठीची खडाखडी सध्या सांगलीच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. राजकीय कार्यक्रम असो किंवा घरगुती, प्रत्येक ठिकाणी इच्छुक कुरघोडी करण्याची संधी साधून राजकीय वातावरण तापवत आहे. त्यातून उमेदवारीच्या स्पर्थेत आपणच कसे उजवे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीला अजून आठ महिन्याचा अवधी असला तरी आतापासूनच सांगलीत दोन पाटलांमध्ये जोरदार जुंपली आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील आणि लोकसभेचे इच्छुक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यात राजकीय फटकेबाजी सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या स्टेजवरून विशाल पाटील यांनी टाकलेले बॉऊन्सर बॅटवर घेत खासदार संजय पाटील यांनी त्यांच्या शैलीत फटकेबाजी केली. त्यांची ही फटकेबाजी लोकसभेची तयारी असल्याचे बोलले जात आहे. त्याला निमित्त मिळालं ते टेंभू पाणी योजनेवरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण.

सांगलीतील तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील 18 गावांना टेंभू योजनेच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी विस्तारित थेंबा योजनेच्या अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, या मागणीसाठी आमदार सुमनताई पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरु आहे. याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील हे उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरून बोलताना त्यांनी थेट खासदार संजय पाटील यांच्यावर निशाणा साधला. "स्वतःच्या पोराला बाजूने ठेवून पत्रकार परिषद घ्यायची. तुमचं आणि तुमच्या पोराचं कर्तव्य काय ? तुमची ओळख सगळ्या राज्याने ओळखली आहे. तुम्हाला आयत्या बिळात नागोबा, म्हणून ओळखलं जातंय", असा टोला विशाल पाटील यांनी खासदार पाटील यांना लगावला.

"संजय पाटील यांची आता अडचण झाली आहे. स्वतःच्याच पक्षाने त्यांना निष्क्रिय ठरवले आहे. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ते आमदारकीला सरकूया का ? म्हणून सुमनताई यांच्या विरोधात लढूया, असा विचार करत असतील. खासदारांचा जो कार्यक्रम आहे, तो दहशत आणि गुंडगिरीचा आहे. त्या माध्यमातूनच सगळं काही सुरू आहे. सुरुवातीला बंदूक खिशाला लावून फिरवायचे, आता नगरपालिकेचे, पंचायतीचे सदस्य आपले होण्यासाठी गोळ्या झाडून माणसे पळवून नेतात", असा आरोपही पाटील यांनी केला.

खासदार संजय पाटलांनी दिले प्रत्युत्तर...

उपोषणाच्या व्यासपीठावरून बोलणाऱ्या विशाल पाटील यांना खासदार संजय पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे."बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना" असा टोला लगावत विशाल पाटील यांना आता आपण खासदार झालं असे वाटत आहे. आरोप करणाऱ्यांनी स्वतःच राजकारण बघावं. फक्त निवडणुकीला माझ्या विरोधात उभा राहा, मागच्या वेळा पेक्षा कमी मते देऊन जनता जागा दाखवेल. लोकं मला स्वीकारतील का नाही ते जनता ठरवेल", असे थेट चॅलेंज खासदार संजय पाटील यांनी दिले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT