Dhairyasheel Mohite Patil- Chandrashekhar Bawankule-Ranjitshinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Loksabha : मोहिते पाटील-निंबाळकर वादावर बावनकुळे अकलूजमध्ये तोडगा काढणार?

दत्तात्रय खंडागळे

Sangola News : माढा लोकसभा मतदारसंघाच्या तिकिटासाठी भाजपमध्येच शह-कटशह रंगला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुरू केलेली गोळाबेरीज आणि मोहिते पाटील यांच्याकडूनही ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत दंड थोपटले आहेत. निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात उमेदवारीसाठी सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या मंगळवारी (ता. 26 डिसेंबर) अकलूजच्या दौऱ्यावर येत आहेत. उमेदवारीवरून दोन पहिलवानांमध्ये रंगलेल्या कुस्तीत बावनकुळे वस्ताद अकलूजमध्ये कोणता निर्णय जाहीर करतात की दोन्ही गटाला झुलवत ठेवतात, याची उत्सुकता आहे. (BJP State president Chandrashekhar Bawankule on a visit to Akluj tomorrow)

काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांचा माळशिरसमध्ये दौरा होणार होता. मात्र, तो दौरा रद्द झाल्याने बावनकुळे उद्या मंगळवारी अकलूजमध्ये येणार आहेत. माढा लोकसभेच्या तिकिटावरून निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात सध्या पक्षांतर्गत तीव्र संघर्ष सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून माढा ओळखला जात होता. कारण मोदी लाटेतही २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील हे निवडून येत बालेकिल्ला राखला होता. पण, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रुपाने भाजपने २०१९ मध्ये हा मतदारसंघ पहिल्यांदाच जिंकला. मात्र, भाजपच्या या विजयात मोहिते पाटील यांचे मोठे योगदान होते.

माढा मतदारसंघातील बहुतांश आमदार हे भाजपचे आहेत, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा गड होऊ पाहत आहेत. मात्र, पक्षातील सुप्त संघर्षामुळे भाजपमध्ये वाद पेटला आहे. त्यातही मोहिते पाटील यांची ताकद मतदारसंघात निर्णायक आहे. निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत, तर मोहिते पाटील यांचा या मतदारसंघात दबदबा आहे. त्यामुळे कोणालाही उमेदवारी दिली तर एकजण नाराज होणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

शिंदे बंधूंशी संधान अन्‌ मोहिते पाटलांचा विरोध वाढला

निवडून आल्यानंतर काही दिवसांतच खासदार निंबाळकर व मोहिते पाटील यांचा मतभेद होऊन खटके उडू लागले. निंबाळकर यांनी संभाव्य विरोध लक्षात घेऊन मोहिते पाटील यांचे विरोधक माढ्याचे शिंदे बंधूंशी संधान बांधले. त्यामुळे मोहिते पाटील अधिकच संतापले. त्यातूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचे लढविण्याचे संकेत दिले. त्यामुळे संघर्ष वाढत गेला. त्याला सोशल मीडियातून देान्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी हवा दिली.

मित्रपक्षांमुळे पोषक मतदारसंघ; पण पक्षांतर्गत बंड धोक्याचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी माढ्यात भक्कम आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे शहाजी पाटील हे आमदार आहेत. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात बळ मिळाले आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे दीपक चव्हाण, सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे, आमदार शहाजी पाटील या नेत्यांमुळे सध्या हा मतदारसंघ भाजपला अधिकच पोषक बनला आहे. मात्र, पक्षांतर्गत बंड भाजपला धक्का देऊ शकते. त्यामुळे दोन्ही गटाला कसे समजावयाचे हा प्रश्न बावनकुळे आणि भाजप नेत्यांसमोर असणार आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT