Solapur, 18 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळून आली असून, ती त्रुटी दूर करण्यासाठी त्यांना तीन दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. याच मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांच्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी दहा, तर माढ्यासाठी सात अर्ज बुधवारअखेर (ता. 17 एप्रिल) दाखल झालेले आहेत. माढा व सोलापूर या मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 19 एप्रिलपर्यंत आहे. अर्जांची छाननी 20 एप्रिल रोजी होणार असून, 22 एप्रिल रोजी अर्ज माघारी घेता येणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सातपुते यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातपुते यांच्या अर्जातील एका पानावर स्वाक्षरी राहिली आहे. ही बाब फार गंभीर नाही, त्यांना पुढील तीन दिवसांत ती स्वाक्षरी करावी लागणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या प्रति आयोगाच्या नमुन्यात नाहीत, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. माढ्यातील उमेदवारांचे अर्ज अचूक असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्यांच्या अर्जांत त्रुटी आहेत, त्या उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत किंवा छाननीपर्यंत त्या त्रुटींबाबत पूर्तता करायची आहे. जे उमेदवार त्रुटींची पूर्तता करतील, त्यांचेच अर्ज छाननीत ग्राह्य धरले जातात. अन्यथा ते अर्ज बाद होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अर्ज भरल्यानंतर काही वेळात अर्जांतील त्रुटींबाबत संबंधितांना कळविण्यात येते. त्यानुसार गायकवाड आणि राम सातपुते यांना कळविण्यात आले आहे.
सोलापूरसाठी दाखल झालेले अर्ज
दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Lok Sabha Constituency) भाजपकडून राम सातपुते आणि संस्कृती राम सातपुते, वंचितकडून राहुल गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून रविकांत बनसोडे, तर परमेश्वर गेजगे, श्रीदेवी जॉन फुलारे, विजयकुमार उघडे, दगडू घोडके, विद्या दुर्गादेवी कुरणे, राहुल बनसोडे आणि अण्णा मस्के यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
माढ्यासाठी दाखल झालेले उमेदवार
भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून विजयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील, आरपीआयकडून संतोष बिचुकले यांनी, तर संदीप जनार्दन खरात, भाऊसाहेब लिगाडे आणि गणेश चौगुले यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Madha Lok Sabha Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.