Vijaykumar Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vijaykumar Deshmukh : सोलापुरात आलेल्या भाजप नेत्याच्या शुभेच्छा...शहर उत्तरमधून देशमुखांची उमेदवारी निश्चित?

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील निकाल लक्षात घेता भाजपला माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला डावलणे अडचणीचे ठरू शकते.

सरकारनामा ब्यूरो

प्रभू वारशेट्टी

Solapur, 17 October : आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही देशमुखांना भाजपची उमेदवारी देण्यास पक्षातून विरोध होत आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला माजी उपमहापौर आणि इतर सात माजी नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे, तर विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात माजी महापौर, माजी सभागृह नेत्यांनी दंड थोपटले आहेत. मात्र, सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी देशमुखांना शुभेच्छा दिल्या आहेत, त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील निकाल लक्षात घेता भाजपला माजी मंत्री विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला डावलणे अडचणीचे ठरू शकते, त्यामुळे पुन्हा एकदा देशमुख यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.

विजयकुमार देशमुख हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून (Solapur City North Constituency) २००४ पासून तब्बल चार वेळा निवडून आले आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देशमुख यांना उमेदवारी देण्यास पक्षातूनच तीव्र विरोध झाला होता. माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी सभागृह नेते जगदीश पाटील आणि काही पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारांच्या संदर्भात सर्व्हे करण्यात आला आहे. त्या सर्व्हेच्या आधारे अनेकांचा पत्ता कट होऊ शकते. अनेक ठिकाणी भाजपकडून नवखे चेहरे दिले जाऊ शकतात. पण, भाजपकडून पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून पुन्हा सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी देशमुखांच्या हाती पुन्हा एकदा कमळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खुद्द संघाच्या यादीतही त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या स्वयंसेवकाला संधी देण्याबाबतचा विचार पक्षातून झाल्याची चर्चा आहे. मात्र, निवडून येण्याच्या निकषावर माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांचे पारडे जड आहे, त्यामुळे कोणी कितीही हातपाय मारले तरी भाजपकडून देशमुखांना पसंती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. उलट लोकसभा निवडणुकीत विजयकुमार देशमुख यांनीच राम सातपुते यांना सर्वाधिक मताधिक्य दिले आहे.

त्यामुळे इतर कोणाही इच्छुकांपेक्षा देशमुखांचे पारडे उमेदवारीसाठी जड मानले जात आहे. तसेच बंडखोरी टाळण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असताना देशमुख यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला डावलण्याचे धाडस भाजप दाखवणार नाही, अशीही चर्चा आहे.

माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार विजयकुमार देशमुख यांना निवडणुकीसाठी एकीकडे शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे देशमुख यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT