Solapur, 02 September : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी गेल्या काही वर्षांपासून सुरू केली होती. मात्र, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून लढायचे की सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून लढायचे, हे निश्चित होत नव्हते. अखेर महेश कोठे यांनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
महेश कोठे (Mahesh Kothe) यांच्या कार्यकर्त्यांकडून सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात प्रचाराला सुरूवात केली आहे. मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे, त्यातून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न महेश कोठे यांच्याकडून सुरू आहे. विशेष म्हणजे महेश कोठे हे या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून (NCP) तुतारी या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत.
गेल्या वीस वर्षांतील मतदारसंघातील अंधार संपविण्यासाठी शहर उत्तरच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनाची गरज आहे. चला परिवर्तन घडू या, विकासाची वाट धरू या, या स्लोगनच्या माध्यमातून महेश कोठे यांनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात (Solapur City North) परिवर्तनाची हाक दिली आहे. ‘शहर उत्तरच्या विकासाला एकच उत्तर महेश कोठे’ असे आवाहनही त्यांच्याकडून शहर उत्तर मतदारसंघातील मतदारांना करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज यात्रा सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात आली होती. त्या यात्रेच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर शहरातून राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून आणा, असे आवाहन केले होते. त्याचवेळी त्यांनी पक्षातील मतभेद बाजूला ठेवा, असेही म्हटले होते. पण काही दिवसांतच सोलापूर राष्ट्रवादीतील दुफळी समोर आली होती.
दरम्यान, शिवस्वराज्य यात्रेपासून महेश कोठे हे पक्षात ॲक्टिव्ह दिसत नव्हते. पक्षातील काही नेत्यांवर ते नाराजी असल्याची चर्चा होती. तसेच सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्याशी महेश कोठे यांची शाब्दीक चकमक झाली होती. मात्र, पक्षात नाराजीनाट्य रंगलेले असताना महेश कोठे यांनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघामधून प्रचाराला सुरूवात केली आहे.
महेश कोठे यांनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून 2009 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या वेळी आघाडी असतानाही माजी महापौर मनोहर सपाटे यांनी बंडखोरी केली होती. त्या निवडणुकीत कोठे हे विजयाचा नजीक पोहोचले होते. मात्र, दहा हजाराच्या मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
महेश कोठे यांनी 2014 मध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. पुढची 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकिट नाकारले होते, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता ते तीनही पराभव धुवून काढण्याची संधी महेश कोठे यांना मिळाली आहे, त्याचा फायदा ते कसा उठवतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे.
सुधीर खरटमल राजीनामा माघार घेणार का?
राष्ट्रवादीचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी रविवारी सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी मी यापुढे शहराध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, असे म्हटले आहे, त्यामुळे पक्षातील गटबाजी उघडपणे प्रकर्षाने दिसून येत आहे. आता वरिष्ठ पातळीवरून या वादावर काय तोडगा काढला जाऊ शकतो, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.