Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : सातारचे दोन्ही राजे शशिकांत शिंदेंच्या प्रेमात; महेश शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न..

Shashikant Shinde आमदार शशिकांत शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार व अमित कदम यांचा मेळ झाला तरच शिवेंद्रसिंहराजेंपुढे आव्हान उभे राहणार आहे.

Umesh Bambare-Patil

Shashikant Shinde News : सातारच्या दोन्ही राजांमुळे कोरेगाव मतदारसंघात पराभूत झालेले आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून सध्या बेरजेचे राजकारण सुरू आहे. मागील काळात झालेल्या चुका दुरूस्त करून कोरेगावातून पुन्हा आमदार होण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. मागील दोन चार दिवसांत शशिकांत शिंदेंचे Shashikant Shinde गाव हुमगावच्या यात्रेच्यानिमित्ताने सातारच्या दोन्ही राजांनी त्यांची घेतलेली भेट आगामी काळात जावळी तालुक्यात वेगळी समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. तर कोरेगावात सातारच्या दोन्ही राजांच्या मदतीने आमदार महेश शिंदेंना Mahesh Shinde शह देण्याचाही प्रयत्न आमदार शिंदेंकडून होऊ शकतो.

जावळीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झालेल्यानंतर पंधरा दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकतीच खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे व माथाडी नेते ऋषिकांत शिंदे यांची हुमगाव येथील निवासस्थानी एकापाठोपाठ भेट घेतली. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

जावळी महाबळेश्वर मतदारसंघातून आमदार झालेले शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघ पुनर्रचनेत सातारा जावळी मतदारसंघ झाल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला. जावळीचे सुपुत्र असूनही शशिकांत शिंदे यांना कोरेगावमध्ये विस्थापित व्हावे लागले. त्यानंतर 2019 च्या निवडणूकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये गेले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून दीपक पवारांनी दोन हात केले. महाविकास आघाडीची सत्ता येवून ही राष्ट्रवादीचा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बाबत साॅफ्टकाॅर्नर राहिला.

त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी जावळीच्या राजकारणात लक्ष घालून राष्ट्रवादीला बळकटी देण्याचा केलेला प्रयत्नाने शिवेंद्रसिंहराजे भोसले दुखावले. तेथूनच त्यांच्यात व शशिकांत शिंदे यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. शिंदे यांचा कोरेगावमधील पराभवास दोन्ही राजांचा हात असल्याची चर्चा झाली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले खास विश्वासू ज्ञानदेव रांजणे यांना उभे करून शिंदे यांना आव्हान दिले.

या निवडणुकीत राज्य पातळीवरील नेत्यांनी विनंती करूनही ज्ञानदेव रांजणे यांनी शिवेंद्रराजे यांचा आधार घेत माघार न घेता शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एक मताने पराभव केला. हा पराभव आमदार शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका लागतील या शक्यतेने दोन्ही गटांकडून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

या घडामोडीत खासदार उदयनराजे भोसले हे मात्र, जावळीतील राजकारणात कधीच सक्रिय वाटले नव्हते. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जावळीतील वाढलेल्या भेटीगाठी पाहता जावळीत नक्कीच काहीतरी राजकीय भूकंप घडण्याची शक्यता आहे. शशिकांत शिंदे व खासदार उदयनराजे भोसले यांच्यात कधीच टोकाचे मतभेद, संघर्ष पाहायला मिळाला नाही.

तरीही शशिकांत शिंदे हे सातारा नगरपालिका राष्ट्रवादी पक्षाकडून लढवण्याची विधाने करत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीतील खासदार उदयनराजे भोसले यांच्या पराभवाचा मुद्दा सोडला तर खासदार उदयनराजे व शशिकांत शिंदे यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला नाही. मात्र गेल्या दोन वर्षांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांच्यात जावलीतील वर्चस्वावरून अधूनमधून खडाखडी होत असते.

काही दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य अमित कदम यांनी राष्ट्रवादीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या मेळाव्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच टार्गेट असले तरी त्यांच्यावर थेट नाव घेऊन टीका करण्याचे सर्वांनी टाळले होते. आमदार शशिकांत शिंदे हे या मेळाव्यात जास्त उत्साही दिसत होते. मेळाव्याला झालेली गर्दी राष्ट्रवादीच्या पूर्ववैभवाची साक्ष देणारी होती. तरीही आमदार शशिकांत शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार व अमित कदम यांचा मेळ झाला तरच शिवेंद्रसिंहराजेंपुढे आव्हान उभे राहणार आहे.

मात्र, राजकारणाची दिशा कधी बदलेल हे सांगता येत नाही. परवा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काही कार्यक्रमानिमित्त हुमगावात गेले होते. ही बाब शशिकांत शिंदे यांना समजताच त्यांनी आमदार भोसले यांना आपल्या घरी नेऊन त्यांचे केलेले स्वागत दोघांतील दुरावा कमी करणारे ठरणार आहे. पण, भाविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत या निवडणूकाची समीकरणे बदलणारी ठरणार आहेत. तर कोरेगावात सातारच्या दोन्ही राजांच्या मदतीने आमदार महेश शिंदेंना शह देण्याचाही प्रयत्न आमदार शिंदेंकडून होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT