Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Dream Project : मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला ब्रेक; पंढरपूर कॉरिडॉरसाठी अर्थसंकल्पात केलेली 10 कोटींची तरतूद रद्द

Pandharpur Corridor : पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाला पहिल्याच सभेत ब्रेक. प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखाली 10 कोटींची तरतूद रद्द. नगरपालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी; फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टवर प्रश्नचिन्ह.

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur, 28 February : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत ब्रेक लावण्यात आला आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या अंदाजपत्रकात 10 कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, त्या तरतुदीला नगराध्यक्षा भालके यांच्यासह सर्व नगरसेविकांनी विरोध दर्शविल्यामुळे ही प्रस्तावित 10 कोटी रुपयांची तरतूद काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी नगरसेविकांमध्ये सभेत अनेक विषयांवरून जोरदार खडाजंगी झाली.

पंढरपूरमधील (Pandharpur ) विठ्ठल मंदिर परिसर आणि व्यापारी संकुलाच्या विकास आराखड्यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. स्थायी समितीमध्ये भाजपचे वर्चस्व असल्याने त्या ठिकाणी हा निधी मंजूर झाला होता.

स्थायी समितीमध्ये मंजूर झालेल्या १० कोटींच्या निधीचा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी अंदाजपत्रकात समाविष्ठ करून त्याची घोषणा केली होती. मात्र, नगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष भालके यांच्यासह सर्वच नगरसेविकांनी काॅरिडाॅरसाठीच्या (Corridor) तरतुदीस विरोध दर्शविल्याने प्रस्तावित 10 कोटी रुपयांचा निधी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी 273 कोटी 47 लाख रुपयांचा पंढरपूर नगरपालिकेचा अर्थसंकल्प मांडला. त्या अंदाज पत्रकात विठ्ठल मंदिर परिसरातील प्रस्तावित काॅरिडाॅरसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्याला नगरसेवक राहुल शिंदे, ओंकार जोशी व इतर नगरसेवकांनी आक्षेप घेतला. ही तरतूद रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानंतर नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्या सहमतीने कॉरिडॉरसाठी करण्यात आलेली ही तरतूद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारकडून लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून निर्णय घेतला जात आहे. स्थानिकांना डावलून पंढरपूर कॉरिडॉरसाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. या कॉरिडॉरला आमचा तीव्र विरोध आहे, असे नगरसेवक राहुल शिंदे यांनी सांगितले.

नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी दोन दालने घेतली आहेत. दालनाला कुलूप लावले जाते. यापूर्वी असे प्रकार कधीही घडलेले नाहीत. उपनगराध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती यांना नवीन दालने उपलब्ध करुन द्यावीत; अन्यथा नगरपालिकेच्या पोर्चमध्ये बसून कामकाज करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक लक्ष्मण शिरसट यांनी दिला. त्यावर वेळेत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT