Solapur, 08 February : सोलापूर जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितींसाठी शनिवारी चुरशीने मतदान झाले. मात्र, मतदानानंतर मोहोळ तालुक्यात ईव्हीएम मशिन एका हॉटेलच्या बाहेर आढळून आल्या होत्या. त्यावरून मोठा गदारोळ उठला होता. त्या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते, त्यानुसार ईव्हीएम मशीन वाहून नेणाऱ्या वाहनचालकावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निवडणूक प्रक्रियेतील वाहन क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय स्ट्रॉंग रूममधून बाहेर घेऊन जाणे, ते वाहन तत्काळ परत आणण्याचे आदेश देऊनही ते परत आणण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी वाहन चालक दिनेश संजय भांगे (रा. मोहोळ, जि. सोलापूर Solapur) याच्यावर मोहोळ (Mohol) पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मोहोळ पोलिसांच्या (Mohol Police) माहितीनुसार, प्रसाद माणिकराव पाटील यांची निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याकडे निवडणूक कामासाठी एमएच 13, इएस 5929 ही मोटार (इर्टिका) देण्यात आली होती. त्या मोटारीवर दिनेश भांगे हा चालक म्हणून कार्यरत होता. भांगे यास क्षेत्रीय अधिकारी व त्यांच्या सोबतच्या पथकाच्या परवानगीशिवाय वाहन कोठेही घेऊन जाऊ नये, अशी सूचना देण्यात आल्या होत्या.
आपल्या वाहनात मतदान यंत्र असल्याची माहिती असूनही चालक भांगे याने क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय परस्पर मोहोळ येथील स्ट्रॉंग रूममधून वाहन काढून ते मोटार वाहनमालक अभय गव्हाणे यांच्या हॉटेल समोर नेऊन उभे केले. क्षेत्रीय अधिकारी पाटील यांनी वाहन तत्काळ मोहोळ स्ट्रॉंग रूम येथे परत आणण्याचे आदेश दिले असतानाही चालकाने टाळाटाळ केली, त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांचा जमाव जमा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन, दंगलसदृश्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या प्रकरणी क्षेत्रीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार मोटारचालक दिनेश भांगे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील तपास करीत आहेत.
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी काय म्हटले होते?
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख म्हणाले, त्या मशीनमध्ये कोणतेही मतदान झालेले नव्हते. या मशीन्सच्या माध्यमातून कोणताही गैरप्रकार झालेला नाही. पण ईव्हीएमची काळजी घेणं, हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या अधिकाऱ्याकडून चूक झालेली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत.
संबंधित अधिकाऱ्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करत आहोत. वस्तुस्थिती काय आहे, याची स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहोत. संबंधित अधिकाऱ्यांचे खुलासे घेतलेले आहेत. संबंधित प्रकरणाचा पंचनामा करण्यात आलेला आहे. वाहनचालकाने हलगर्जीपणा केला असे आम्हाला वटतंय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात झोनल अधिकारी, त्यांचे साहाय्यक आणि संबंधित वाहनचालक दोषी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.