Prashant Paricharak -Chandrashekhar Bawankule -Samadhan Autade  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Politic's : बावनकुळे मिटविणार आवताडे-परिचारक वाद; फडणवीसांप्रमाणे शिष्टाई यशस्वी ठरणार?

Assembly Election 2024 : भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत कोणता तोडगा निघतो, याकडे सोलापूरच्या भाजपचे लक्ष लागून राहिले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 26 October : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विधानसभा उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी आता खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाच पुढाकार घ्यावा लागला आहे. विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत माजी आमदार प्रशांत परिचारकही विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.

मागील पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश आले होते, आता बावनकुळे कोणता चमत्कार घडविण्यावर, याकडे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विद्यमान आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून या दोन्ही आजी-माजी आमदारांमध्ये वाद आहे. भारतीय जनता पक्षाच्या या दोन नेत्यांमध्ये असलेला वाद मिटविण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर असणार आहे, तो वाद मिटविण्यासाठी बावनकुळे हे पंढरपुरात येणार आहेत.

माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज आहेत. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील दोन्ही नेत्यांमध्ये असलेला वाद परवडणारा नाही, त्यातूनच आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला आहे.

भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत कोणता तोडगा निघतो, याकडे सोलापूरच्या भाजपचे लक्ष लागून राहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे बावनकुळे यांना या दोघांमधील वाद मिटविण्यात यश येते का ते पाहावे लागेल.

वास्तविक पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांचा उमेदवारीसाठी दावा होता. मात्र, त्या वेळी सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमधील उमेदवारीचा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला होता. विशेष म्हणजे त्या वेळी फडणवीस यांना यश आले होते.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना अपक्ष लढलेल्या समाधान आवताडे यांच्यापेक्षा जादा मते होती. मात्र, पंढरपूरची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थिती जिंकायची, हे ध्येय समोर ठेवून परिचारक यांनी दोघांमध्ये यशस्वी शिष्टाई केली होती. त्यावेळी परिचारक यांनी माघार घेत आवताडे यांच्यासाठी मते मागितली होती. विशेष म्हणजे दिलेल्या शब्दाप्रमाणे पंढरपूरमधून त्यांनी आवताडेंना मताधिक्य मिळवून दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT