Solapur, 25 October : दक्षिण सोलापूर मतदारसंघावरून महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगले आहे. जागा वाटपावरून बड्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे, त्यातूनच खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा विषय दिल्लीपर्यंत नेला आहे. त्या ठिकाणी दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्यात यश आल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केला आहे, त्यामुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसलाच सुटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मतदारसंघाबाबत अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातून (South Solapur Constituenc) माजी आमदार दिलीप माने हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेकडून अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावरून काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
त्या अस्वस्थेमधूनच माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या समर्थकांचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात माने यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा इशारा दिला होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हेही या मेळाव्याला उपस्थित होते. मात्र, मेळाव्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये चेतन नरोटे यांनी माने यांच्या निवासस्थानी येत प्रणिती शिंदे यांचा निरोप कळविला.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सोलापूरमधील मतदारसंघाच्या जागा वाटपाचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलेला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा विषय शिंदे आणि इतर काँग्रेस नेत्यांनी प्रतिष्ठेचा केलेला आहे. याच मतदारसंघावरून प्रणिती शिंदे यांनी दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा केली आहे, त्यानंतर प्रणिती शिंदे यांनी चेतन नरोटे यांना फोन करून याबाबतची माहिती दिली.
चेतन नरोटे म्हणाले, काँग्रेस आणि माजी आमदार दिलीप माने यांचे कार्यकर्ते गेल्या चार दिवसांपासून दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी आंदेालन करत होते. मेळावा झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना मी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या कानावर घातली. त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार आहे, असा निरोप दिलीप माने यांना द्या. त्यामुळे दक्षिण सोलापूर हा काँग्रेसचा मतदारसंघ असून तो काँग्रेस पक्षाकडेच राहणार आहे.
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बंडखोरीचे संकेत
तत्पूर्वी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आमदार दिलीप माने यांनी आज आक्रमक शैलीत भाषण करत बंडखोरीचे संकेत दिले. ‘माझ्या बापाने 1967 ला बंडखोरी केली अन् आमदार झाले. आम्ही काय बंडखोरीच करायची का?’ असा सवाल करत अकरा ठिकाणी बंडखोर उभे करण्याचे सूतोवाच केले.
मी 2014 मध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली आहे, त्यामुळे त्यांना कसं पराभूत करायचं हे मला माहिती आहे. जनतेने ठरवलं आहे, आता बदल घडवायचा आहे. सोलापूर जिल्ह्यात 11 तालुके आहेत आणि मला 11 भाऊ आहेत, त्यामुळे मी कुठं कुठं किती उमेदवार उभं करु शकतो, विचार करा, असे आव्हान दिलीप माने यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.