Satara News : शिवसेना असो की राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर अजित पवारांचं बंड, या सगळ्या प्रवासात छगन भुजबळ यांनी आपला राजकीय दबदबा कायमच दिसून आला आहे. त्यांच्या कणखर बाण्यानं विरोधक तर सोडाच त्यांच्या पक्षातील नेतेमंडळीही त्यांच्याशी थोडं दबकून राहत असत. पण अशा फायरब्रँड नेत्यांना यावेळी प्रमुख दावेदारी असतानाही मंत्रिपदानं हुलकावणी दिली.
अजितदादांकडून त्यांचा पत्ता 'ठरवून' कट झाल्याचंही बोललं जात आहे.यामुळे नाराज भुजबळांनी अजितदादांवर जोरदार शाब्दिक फायरिंगही केली.तसेच ते मोठा निर्णय घेऊन भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात आहेत. याचवेळी त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधली जात असल्याचं दिसून येत आहे.
त्यांनी फडणवीसांसोबत एकाच गाडीतून चक्क 40 किलोमीटर प्रवास तर केलाच,शिवाय मुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुकही केलं.हा कुठंतरी अजितदादांसाठी इशाराच तर नाही ना अशी चर्चाही राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू झाली आहे.
साताऱ्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शुक्रवारी (ता.3) पुन्हा एकत्र आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे भुजबळांनी फडणवीसांसोबत एकाच गाडीतून तब्बल 50 मिनिटे प्रवास केला. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अनुपस्थितीत हे दोन्ही नेते एकत्र येत असल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची सागर बंगल्यावर तब्बल 40 मिनिटं चर्चा केली होती. यानंतर भुजबळांनी थेट फडणवीसांचं तोंडभरुन कौतुकही केलं. तसेच फडणवीसांनीही भुजबळांवर स्तुतीसुमनं उधळली आहे. यामुळे ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर ना अशी कुजबुज सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच सावित्रीबाई फुलेंच्या जन्मस्थळी अर्थात सातारा येथील नायगाव येथे जाण्याचा निर्णय घेतला. ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले छगन भुजबळ मात्र दरवर्षी 3 जानेवारीला नायगावला येतात. यावेळी त्यांनी फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास करत नायगाव गाठलं. भुजबळांच्या पुढाकारातूनच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम नायगावात येथे काही वर्षांपासून होत आहे.
मंत्रिपदासाठी डावलल्यानंतर संतापलेल्या छगन भुजबळांनी थेट पक्षनेतृत्वावरच टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही सहभाग घेतला नव्हता. तसेच राजकीय वातावरण तापवत समर्थकांसह समता परिषदेच्या नेते,पदाधिकारी यांचे मेळावे,बैठका घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.
आता परदेशातून परतल्यानंतर पुन्हा एकदा भुजबळ चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी सागर बंगल्यावर आणि आता एकाच गाडीतून 50 मिनिटं प्रवास करत त्यांनी फडणवीसांशी आपली वाढती जवळकीचे दर्शन घडवून दिलं. हा कार्यक्रम निमित्त आणि भुजबळांचे हे पक्षांतराचे संकेत तर नाही ना अशी चर्चा झडू लागली आहे.
देवेंद्र फडणवीस हे सावित्रीबाई फुलेंचं काम पुढे नेत आहात असे कौतुकोद्गार काढले आहेत. यावेळी त्यांनी वाकिफ कहाँ जमाना हमारी उडान से, वो और थे जो हार गए आसमान से,अशी शेरोशायरीही केली. तर फडणवीसांनीही भाषणातून शेरोशायरी करत भुजबळांच्या कार्याचा गौरव केला आहे.
"मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर, लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया"अशी शेरोशायरी सादर केली.नायगाव हे प्रेरणास्थळ झाले पाहिजे, हे तुम्ही ओळखले आणि त्याची सुरुवात तुम्ही केली.यामुळे फडणवीसांनी भुजबळांवर कौतुकाचा वर्षाब केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.