Shivendrasinghraje Bhosale- Bhushan Gavai  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Cji Bhushan Gavai : सरन्यायाधीशांनी केले शिवेंद्रसिंहराजेंचे जाहीरपणे कौतुक; म्हणाले, ‘गिनिज बुकमध्ये नोंद करण्यासारखे काम...’

Shivendrsinghraje Bhosale News : जनतेच्या हिताचे प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या कौतुक सोहळ्यानंतर दिली.

Umesh Bambare-Patil

Satara, 19 August : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कामाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश भूषण गवई यांनी कोल्हापूच्या कार्यक्रमात जाहीरपणे कौतुक केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम गिनिज बुकमध्ये नोंद करण्यासारखे आहे, असे गौरवोद्‌गार सरन्यायाधीशांनी काढले. सरन्यायाधीशांसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रिमंडळातील आपल्या लाडक्या सहकाऱ्याचे कौतुक करून त्यांनी केलेल्या कामाबद्दल पाठ थोपटली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai ), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्‌घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कामाबद्दल अनेक वक्त्यांनी गौरवोद्‌गार काढले.

महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrsinghraje Bhosale) यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभाग आणि अतुल चव्हाण यांच्या संपूर्ण टीमने जे अशक्य आहे, ते शक्य करून दाखवले आहे. मी तर म्हणतो, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी, अशीही ही बाब आहे, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे.

सरन्यायाधीश म्हणाले, सुमारे कोल्हापूर सर्किट बेंचच्या संपूर्ण इमारतीचे अवघ्या २० ते २५ दिवसांत रुपडे बदलविण्याचे काम बांधकाम विभागाने केले आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयाला साजेशी अशी सुंदर इमारत उभारण्याचे काम करण्यात आले आहे, त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करून आभार मानतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांचेही अभिनंदन केले. ते म्हणाले, आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मी विशेष अभिनंदन करतो. त्यांनी उठावदार असे काम केलेले आहे. तसेच, मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचेही अभिनंदन करतो.

हेरिटेजसारखा लूक ठेवून कोल्हापूर सर्किट बेंचच्या इमारतीचे काम अतिशय नेटके झाले आहे. त्याबद्दल बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे गौरवोद्‌गार काढले आहेत.

सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळालेल्या शाबासकीमुळे आणि कौतुकामुळे काम अधिक जोमाने आणि जिद्दीने करण्याची प्रेरणा मिळाली आहे. जनतेच्या हिताचे प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या कौतुक सोहळ्यानंतर दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT