Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Fadnavis Pandharpur Tour : अधिवेशन संपताच मुख्यमंत्री फडणवीस उद्या पंढरपूरच्या दौऱ्यावर; प्रशांत परिचारकांच्या घरीही भेट देणार

Vitthal Mandir Visit : विठ्ठल मंदिर परिसरात राबवण्यात येणाऱ्या काॅरिडाॅर संदर्भात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर फडणवीस हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी भेट देणार आहेत.

भारत नागणे

Solapur, 28 March : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवशेन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या (ता. 29 मार्च) पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. पंढरपूर दौऱ्यात ते श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मंदिर कामाची पाहणी करणार आहेत. विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि त्यानंतर फडणवीस हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी भेट देणार आहेत. फडणवीसांच्या तातडीने होणाऱ्या दौऱ्यात पंढरपूरसाठी नवीन काय घोषणा होणार का, याची उत्सुकता आहे.

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच बुधवारी (ता. २६ मार्च) संपले. अधिवेशनामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे मुंबईत ठाण मांडून होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दंगलीनंतर पाहणी करण्यासाठी नागपूरला भेट दिली हेाती. तो दौरा सोडता फडणवीस हे अधिवेशनाच्या काळात पूर्णवेळ मुंबईत थांबून होते.

दरम्यान, फडणवीस हे उद्या (ता. २९ मार्च) तुळजापूरहून सकाळी साडेअकराच्या सुमारास पंढरपूरला येणार आहेत. पंढरपूर (Pandharpur) येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते मंदिराची पाहणी करणार आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सध्या सुरू आहे, त्यासाठी राज्य सरकारने 74 कोटी रूपयांचा निधी दिली आहे. या कामाचाही ते आढावा घेतील, अशी माहिती आहे.

विठ्ठल मंदिर परिसरात राबवण्यात येणाऱ्या काॅरिडाॅर संदर्भात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर फडणवीस हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी भेट देणार आहेत. परिचारक यांचे वडिल प्रभाकर परिचारक यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले आहे, त्यामुळे माजी आमदार परिचारक यांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे परिचारक वाड्यावर जाणार असल्याची माहिती आहे.

प्रशांत परिचारक यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस हे कुलदैवत नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत, त्यानंतर फडणवीस हे इंदापूरमार्गे मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे अधिवशेन संपल्यानंतर तातडीने होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजप नेत्यांना कोणता कानमंत्र देणार?

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सध्या निवडणूक सुरू आहे. त्या निवडणुकीची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या खांद्यावर दिली आहे. दुसरीकडे, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पॅनेल उभे करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपचा एकच पॅनेल असणार की मागील निवडणुकीप्रमाणे भाजपचे नेते एकमेकांच्या विरोधात लढणार, याची उत्सुकता आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा पंढरपूर दौरा होत आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते, आमदार आणि माजी मंत्र्यांना फडणवीस कोणता कानमंत्र देणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT