Eknath shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Bhavan : पंढरपुरात उभारणार राज्यातील पहिले मराठा भवन; मुख्यमंत्री आषाढीला करणार भूमिपूजन

Foundation Laying ceremony : राजश्री शाहू भवन असे या वास्तूचे नाव असणार आहे. ही वास्तू उभारण्यासाठी सरकारने एक एकर जागा आणि निधी मंजूर केला आहे.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 16 July : आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाला विविध माध्यमातून खूश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होताना दिसत आहे. त्याच दृष्टिकोनातून पंढरपूर येथे राज्यातील पहिले मराठा भवन (राजर्षी शाहू भवन) उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर उद्या भवनाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटलेले असतानाच सरकारकडूनही ‘सगे सोयरे’ संबंधी अध्यादेश काढण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत. एकीकडे सरकारी पातळीवरून निर्णय होत असताना विकासाच्या मुद्यावरही मराठा समाजाला आपलेसे करण्याचा प्रयत्न सरकारकडून होताना दिसत आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर (Pandharpur) येथे आता पहिले मराठा भवन (Maratha Bhavan) उभारण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या मराठा भवनाचे भूमिपूजन पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी होणार आहे. पंढरपुरात मराठा भवन उभारण्यात यावे, अशी मागणी गेली काही दिवसांपासून होत होती, त्यानुसार राज्य सरकारने मराठा भवनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून सर्व सोयी सुविधांयुक्त मराठा भवन उभारण्यात येणार आहे.

पंढरपूर येथे होणाऱ्या या भूमिपूजन कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्ष साधना भोसले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याबाबत सकल मराठा समाजाचे समन्वयक दीपक वाडदेकर म्हणाले, राजश्री शाहू भवन असे या वास्तूचे नाव असणार आहे. ही वास्तू उभारण्यासाठी सरकारने एक एकर जागा आणि निधी मंजूर केला आहे. या मराठा भवनामध्ये पहिल्या मजल्यावर सभागृह असणारा आहे. दुसऱ्या मजल्यावर सुमारे 200 ते 250 विद्यार्थी बसतील एवढी मोठी अभ्यासिका उभारण्यात येणार आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका उपयुक्त ठरणार आहे. या अभ्यासिकेमध्ये अत्याधुनिक ग्रंथालयही असणार आहे. तिसऱ्या मजल्यावर राज्यभरातून येणारे भाविक आणि समाज बांधवांसाठी निवासाची सोय असणार आहे, असे वाडदेकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT