Uddhav Thackeray-Nana Patole-Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : काँग्रेस अन्‌ ठाकरेंच्या शिवसेनेकडून पवारांच्या राष्ट्रवादीला चॅलेंज; चंदगडमध्ये आघाडीत बिघाडी?

Rahul Gadkar

Kolhapur, 23 September : लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज छत्रपती यांना मताधिक्य मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या चंदगडमधील नेत्यांच्या आशा वाढल्या आहेत. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र, आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसचे गोपाळराव पाटील यांनी नुकताच मेळावा घेत या मतदारसंघावर दावा केला आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघ (Chandgarh Assembly Constituency ) हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे, हे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे, त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच द्यावी, असा निर्धार चंदगडमधील काँग्रेस पक्षाच्या (Congress) संवाद मेळाव्यात करण्यात आला.

मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे चंदगड विधानसभेची उमेदवारी काँग्रेसला नैसर्गिकरित्या मिळणे क्रमप्राप्त आहे,  त्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेले गोपाळराव पाटील यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानेही (Shivsena UBT) मेळावा घेत कोणत्याही परिस्थितीत चंदगड मतदारसंघातून निवडणूक लढवायचीच, असा स्पष्ट इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.

चंदगड मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेने प्रयत्न केले आहेत. हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा आहे, यामुळे या मतदारसंघावर भगवा फडकवायला हवा; म्हणून हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा, असा दावा शिवसैनिकांनी केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभूळकर या इच्छुक आहेत, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि जागा वाटपाच्या मुहूर्तावर चंदगड विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT