Narsayya Adam Master-Praniti Shinde-Sushilkumar Shinde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Narsayya Adam Master : आडम मास्तर स्वबळाची घोषणा करणार?; दिल्लीपासून गल्लीपर्यत फिल्डिंग लावली तरीही काँग्रेस दाद लागू देईना...

Solapur City Central Constituency : लोकसभा निवडणुकीत मदत करूनही मतदारसंघाबाबत काँग्रेसकडून अद्याप ग्रीन सिग्नल येत नसल्यामुळे माकपचे कार्यकर्ते बेचैन आहेत. सोलापूरमधील काँग्रेस नेते त्यावर बोलायला तयार नाहीत, त्यामुळे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे उद्या सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 06 October : सोलापूर शहर मध्य मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात यावा, यासाठी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. दुसरीकडे या मतदारसंघातून काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणूक लढवेल, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीत मदत करूनही मतदारसंघाबाबत काँग्रेसकडून अद्याप ग्रीन सिग्नल येत नसल्यामुळे माकपचे कार्यकर्ते बेचैन आहेत. सोलापूरमधील काँग्रेस नेते त्यावर बोलायला तयार नाहीत, त्यामुळे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam Master) हे उद्या सोमवारी (ता. 7 ऑक्टोबर) आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे पत्रकार परिषदेत मास्तर स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा करणार का?, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत माकपने सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी प्रचार घेतला.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी माकप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रणिती शिंदे यांच्या समोरच आडम मास्तर यांनी विधानसभेचा सोलापूर शहर मध्य मतदारसंघ (Solapur City Central Constituency ) हा माकपसाठी सोडण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी त्याबाबत कोणतेही जाहीर भाष्य केलेले नव्हते.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला सुटणार, असे त्या वेळी आडम मास्तर यांनी सांगितले होते. माकपचे सीताराम येचुरी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासोबत बोलणी झाल्याचे सांगत होते. त्यावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यामुळे आडम मास्तर यांची कोंडी कायम होती.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघ कम्युनिस्ट पक्षाला सोडावा, यासाठी मध्यस्थी करावी, अशी विनंती आडम मास्तर यांनी शरद पवार यांना भेटून केली होती. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांचेही भेट आडम यांनी घेतली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांकडून त्यांना ठोस शब्द देण्यात आलेला नाही.

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सोलापूर शहर मध्य मतदार संघातून काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणूक लढवेल, असे स्पष्ट केले होते, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस पक्ष मित्रपक्षाला सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.

मास्तर लागले कामाला

माजी आमदार आडम यांनी निवडणुकीची तयारी मागेच सुरू केली आहे. थेट मतदारांशी संवाद साधला जात आहे. विशेषतः रे नगरमधील रहिवाशांवर आडम मास्तर यांचा जास्त भर आहे. याशिवाय मतदारसंघातही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी संपर्क वाढविला आहे. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेत आडम मास्तर हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघ काँग्रेसने सोडला नाही तर स्वबळावर लढण्याची घोषणा करणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT