Solapur, 28 September : महाविकास आघाडीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या जागेवरून धुसफूस सुरू आहे. मित्रपक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला आहे. तो काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता विधानसभेची निवडणूक लढवेल, असे त्यांनी आज जाहीर केले, त्यामुळे उद्योजक शिखर पहाडिया यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर त्यांनी पडदा टाकला आहे.
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदसरसंघावर दावा ठोकला आहे. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवेल, असे खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी जाहीर करून टाकले, त्यामुळे महाविकास आघाडीतील वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांना इंडिया आघाडीतील मित्रपक्ष असलेले माकपचे माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam Master) यांनी पाठिंबा दिला होता. त्याचवेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला सोडण्याबाबत सोनिया गांधी आणि सीताराम येचुरी यांच्यामध्ये चर्चा झाली आहे, असेही आडम मास्तर यांनी सांगितले होते.
प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या माकपच्या मेळाव्यात सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. मात्र, त्या वेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांनी कोणतेही भाष्य केले नव्हते. पण आडम मास्तर मात्र सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आपल्याला सोडावा, यासाठी प्रयत्नशील होते.
लोकसभा निकालानंतरही माजी आमदार आडम यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माकपला सोडावा, अशी विनंती केली होती. मात्र, काँग्रेस पक्षाकडून ठोस आश्वासन देण्यात आलेले नव्हते.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी आमदार आडम मास्तर यांची विनंती फेटाळून लावत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ काँग्रेस पक्षच निवडणूक लढवेल, असे जाहीर केले आहे, त्यामुळे आडम मास्तर यांच्यासह राष्ट्रवादीतील इच्छुकांचेही टेन्शन वाढविले आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक तौफिक शेख हेही इच्छूक आहेत. मात्र, ‘सोलापूर शहर मध्य’वरील दावा सोडण्यास काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी नकार दिला आहे.
शिखर पहाडिया यांच्या उमेदवारीचे काय?
दरम्यान, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली होती. गणेशोत्सवात सोलापूरमधील काही गणेश मंडळांना त्यांनी भेटीही दिल्या होत्या. युवक काँग्रेसने त्यांच्या उमेदवारीचीही मागणी केली होती. त्यामुळे ऐनवेळी ते उमेदवार असू शकतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, प्रणिती शिंदे यांच्या स्पष्टीकरणानंतर ती चर्चाही आता थांबवणार आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.