Narsayya Adam Master-Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CMP Leader Meet Sharad Pawar : कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पवारांची भेट; आडम मास्तरांसाठी मतदारसंघ सुटणार का?

Mahavikas Aghadi News : लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधीमंडळाने शरद पवार आणि जयंत पाटील यांचे अभिनंदन केले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 June : विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना आता वेग येत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांची विधानसभा निवडणुकीबाबत स्ट्रॅटेजी ठरलेली असताना आता मित्रपक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधींनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यात सोलापूरचे माजी आमदार नरसय्या आडम यांचाही समावेश होता. त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघ काँग्रेस आडम मास्तरांना सोडणार का, याची चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (CPM) प्रतिनिधीमंडळाने शरद पवार (Sharad Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांचे अभिनंदन केले. तसेच, माकप, किसान सभा, सीटू व इतर जनसंघटना यांनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाबद्दल आणि शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या संघर्षाचे पवार आणि पाटील यांनी विशेष कौतुक केले.

माकपच्या शिष्टमंडळासोबत शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत सुमारे ५५ मिनिटे चर्चा केली. तसेच, राज्यात माकप लढवू इच्छित असलेल्या १२ विधानसभा जागांवर या वेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली.

या बारा विधानसभा मतदारसंघात सोलापूरमधील सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसने तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावा, अशी मागणी केली होती. सुशीलकुमार शिंदे आणि सीताराम येच्युरी यांच्यासोबत या मतदारसंघाबाबत चर्चा झाली असल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले होते. मात्र, काँग्रेसकडून याबाबत कोणतेही भाष्य जाहीरपणे करण्यात आलेले नव्हते.

लोकसभा निवडणुकीनंतर आडम मास्तर यांनी मात्र काँग्रेस आपल्याला सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडणार नाही, त्यामुळे आपल्याला स्वबळावरच सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी लागेल, असे भाष्य केले होते. त्यामुळे काँग्रेस खरंच आडम यांना मतदारसंघ सोडणार का, याची चर्चा सुरू झाली होती.

आडम मास्तर यांच्यासाठी काँग्रेसला सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडायला लावण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते म्हणून शरद पवार मध्यस्थी करणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच महाविकास आघाडीत तो निर्णय होणार का, याची उत्सुकता सोलापूरला आहे.

या प्रतिनिधीमंडळात माजी आमदार नरसय्या आडम, माजी आमदार जे. पी. गावीत, आमदार विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, व डॉ. सुभाष जाधव यांचा समावेश होता. महाविकास आघाडीच्या इतर सर्व प्रमुख नेत्यांना माकपचे प्रतिनिधीमंडळ लवकरच भेटणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT