Ahmednagar Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : अजितदादांचे नगर दक्षिणवर विशेष लक्ष; प्रशांत गायकवाडांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी!

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 14 विधानसभा मतदारसंघांपैकी एकट्या राष्ट्रवादी पक्षाला तब्बल सहा मतदारसंघांत घवघवीत असे यश मिळाले होते. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद ही मोठी आहे. दोन ते तीन मतदारसंघ हे थोडक्या मतांच्या अंतराने हातातून गेले. त्यामुळे एकूणच आता राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी नगर जिल्ह्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलेलं आहे.

यात अजित पवार गटाने आघाडी घेतली असून, उत्तर नगरच्या निवडीनंतर आता दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी अजित पवारांचे विश्वासू जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांची वर्णी लागली आहे. याचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यात उत्तरेमध्ये अकोले, कोपरगाव, राहुरी या तीन ठिकाणी तसेच उत्तर नगरमध्ये नगर शहर, पारनेर, कर्जत जामखेड या तीन ठिकाणी पक्षाचे उमेदवार 2019 ला निवडून आले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतच बंड करत महायुती सरकारमध्ये ते सहभागी झाले.

या वेळी अजितदादांसोबत नगर जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी कर्जत-जामखेडचे रोहित पवार आणि राहुरीचे प्राजक्त तनपुरे वगळता नीलेश लंके, संग्राम जगताप, किरण लहामटे आणि आशुतोष काळे हे चार आमदार अजितदादांसोबत आहेत.

त्यामुळे जिल्ह्यामध्ये आज मितीला अजित पवार गटाचे चार आमदार असताना आणि इतर अनेक तालुक्यांत राष्ट्रवादीची ताकद शरद पवार गटापेक्षा अधिक असताना अजितदादांनी नगर जिल्ह्यावर येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता पूर्ण लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर उत्तर नगरमध्ये कपिल पाटील हे जिल्हाध्यक्ष असताना आता दक्षिण नगरसाठी प्रशांत गायकवाड यांची या पदावर वर्णी लावण्यात आली आहे. प्रशांत गायकवाड हे पारनेर तालुक्यातील असून, आमदार नीलेश लंके यांचे जवळचे मानले जातात. पारनेर बाजार समितीचे सभापती पद त्यांनी यापूर्वी भूषवलेले आहे.

या निमित्ताने त्यांनी शरद पवार, अजित पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना तालुक्यात आणून आपल्या कामाची ओळख करून दिलेली आहे. त्यामुळे मध्यंतरीच स्वतः अजित पवार यांनी प्रशांत गायकवाड यांचे जाहीर सभेत कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर आता दक्षिणेमधून अधिकाधिक विधानसभा निवडणुका जिंकता याव्यात यासाठी प्रशांत गायकवाड यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे बोलले जाते.

एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाची बांधणी, संभाव्य उमेदवारांची चाचपणी आतापासूनच सुरू केली असून, त्या दृष्टीने पक्ष संघटना कार्यरत केलेली आहे. अजित पवार यांचे याबाबत स्वतः जातीने जिल्ह्यातील पक्ष संघटनेवर लक्ष आहे.

मात्र, दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी गट सध्या तरी सुस्तावलेल्या अवस्थेत दिसून येतोय. राष्ट्रवादीचे सहापैकी चार आमदार अजित पवार गटात आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाची ताकद अगदी कमी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत अजितदादांनी नगर जिल्ह्यात अधिकाधिक लक्ष देत 2024 मध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसून येत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT