Solapur, 14 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमधील गटबाजीचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. भाजपचे माजी मंत्री तथा दोन वरिष्ठ आमदारांना डावलून पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत युतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसाच आपण ही युती केल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. कल्याणशेट्टी यांच्या काँग्रेससोबतच्या युतीला माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी मी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी लढणार, असे अवघ्या तासाभरात जोरदार प्रत्युतर दिले आहे. त्यामुळे सोलापुरात भाजपच्या दोन आमदारांमध्ये वाक्युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) १८ जागांसाठी येत्या २७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २८ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी येत्या गुरुवारी (ता. १७ एप्रिल) उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे, तत्पूर्वी सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत युती करणार असल्याचे जाहीर केले आहे.
सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासाेबत युती करण्याचे जाहीर केले. या युतीसोबत दोन्ही देशमुख नसणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, कल्याणशेट्टी यांनी युतीची घोषणा करून एक तास होत नाही, तोच आमदार सुभाष देशमुख यांनी छोटेखानी पत्रक काढून उत्तर दिले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) हे पुन्हा एकदा स्वतंत्रपणे लढणार, हे स्पष्ट झाले आहे.
आमदार देशमुख म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे की आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणुका सुरू होत आहेत, त्यामुळे नेत्यांनी कार्यकर्त्यांसाठी आता परिश्रम घ्यावे, त्यानुसार मी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी लढणार आहे. किती जागा लढवायच्या हे कार्यकर्ते ठरवतील.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत मला एकत्र यावे; म्हणून आवाहन करण्यात आले आहे. तेथे जर सर्वच भाजपचे कार्यकर्ते असतील, तर मी यायला तयार आहे, अशी अटही आमदर सुभाष देशमुख यांनी घातली. खरं तर देशमुख यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजप कार्यकर्त्यांसाठी आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे देशमुख हे कार्यकर्त्यांसाठी किती ताकदीने लढणार, हे आता पाहावे लागेल.
दरम्यान, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपण सोलापूर बाजार समितीची निवडणूक लढविणार नसल्याचे म्हटले आहे. पण त्यांची निवडणुकीत काय भूमिका राहणार याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.