
Solapur, 14 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पक्षातील दोन वरिष्ठ देशमुखांना डावलून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याशी युती केल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आपण काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याचेही कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस-भाजपच्या या पॅनेलची येत्या १६ एप्रिल रोजी घोषणा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे काँग्रेस-भाजपचे पॅनेल काम करणार आहे, असे माजी आमदार दिलीप माने यांनीही स्पष्ट केले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी (Solapur Bazar Samiti Election) भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, श्रीशैल नरोळे, हरीश पाटील, शहाजी पवार,अविनाश महागावकर आदी नेते एकत्र आले आहेत. या वेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठेही उपस्थित होते.
सत्ताधारी भाजपचे आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री आणि माजी सभापती विजयकुमार देशमुख या दोघांना वगळून आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी काँग्रेस नेत्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण कल्याणशेट्टी यांनी दिले आहे.
कल्याणशेट्टी म्हणाले, आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. ही काही पक्षीय निवडणूक नाही. आमची विचारधारा एक आहे. पण, मतदारसंघाची भौगोलिक रचना वेगळी आहे, त्यामुळे थोडीशी गडबड होत आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आजही आहोत, प्रयत्न करतोय, यश येईल, असं वाटतंय. पण, आम्ही सर्वजण एकत्र येऊन पॅनेल जाहीर करतोय.
सोलापूर बाजार समितीसाठी उमेदवारी अर्जच एवढे आले आहेत की, सुभाष देशमुख जरी आमच्यासोबत आले तर निवडणूक ही 99 टक्के लागणारच आहे. निवडणूक लागणाच ह्या हिशेबानेच आम्ही कामाला लागलो आहे. सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्यासोबत कधीही अंतर राहणार नाही. आता मतदारसंघाच्या रचनेवरून थोडीशी गडबड व्हायला लागली आहे. तरीही आमचा सर्वांचा एकत्र येण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, पक्षीय निवडणुकीत जिथं जिथं कमळ येईल, तिथं तिथं मी आणि सुभाष देशमुख कायम एकत्र राहू. बाजार समितीची निवडणूक ही पक्षीय निवडणूक नाही. आमचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. इथल्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत सांगतो की, निकालानंतर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्यामुळे सुभाष देशमुखांनी जरी निवडणूक लढवली तर ती भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली लढतील. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढतोय.
सुभाष देशमुख यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. पण संख्या एवढी झाली आहे की सगळ्याच्या मनासारख्या जागा मिळूच शकत नाहीत. ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजप अशी नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणत्याही नेत्याशी माझे बोलणे झालेले नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढणार. ते सांगतील तोच निर्णय आमच्यासाठी शेवटचा असणार आहे.
...म्हणून मी बाजार समिती निवडणुकीत उतरलो : कल्याणशेट्टी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील 36 गावे अक्कलकोट मतदारसंघात येतात, त्यामुळे तो माझा मतदारसंघ आहे, त्यामुळे मी बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलो आहे, असेही स्पष्टीकरण सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
दोन्ही देशमुख आमचे नेते
दोन्ही देशमुख आमचे नेते आहेत. पण त्यांची अडचण अशी झाली आहे की त्यांच्या मतदारासंघातील कार्यकर्त्यांनी फार्म भरलेले आहेत. एवढ्या सगळ्यांना एकत्रित केल्यानंतर प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. त्यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
आम्ही कल्याणशेट्टींच्या निर्णयासोबत : दिलीप माने
माजी आमदार दिलीप माने म्हणाले, आम्ही सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. मुख्यमंत्र्यांची आम्हाला गरज आहे. बिनविरोधसाठीप्रयत्न करो. त्यांना अधिकार दिले आहेत. जे सोबत येतील, त्यांना सोबत घ्या. आमची काय अडचण नाही. कल्याणशेट्टी जो निर्णय घेतील, त्यासोबत आम्ही असणार आहोत. शेतकरी हिताच्या दृष्टीने सोलापूर बाजार समिती राष्ट्रीय बाजार समिती होणार असेल तर आमची काहीही हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर आम्ही लगेच ठराव देऊ.
गोरे मित्र म्हणून जेवायला आले
पालकमंत्री जयकुमार गोरे हे मित्र म्हणून माझ्या घरी जेवायला आले होते. आम्ही काही राजकीय चर्चा केली नाही. ते चार ते पाच वेळा सोलापूरला आले होते. मात्र, मित्र असल्याने मी त्यांना जेवायाला बोलवले होते. एवढचं त्यात होतं. दुसरं काहीही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.