Sachin Kalyanshetti - Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohol Politic's : फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा जाहीर शब्द; ‘राजन पाटलांच्या सूचनेनुसार मोहोळ अन्‌ जिल्ह्याच्या राजकारणात निर्णय होतील’

Sachin Kalyanshetti Big Statement : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवन यांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते.

Vijaykumar Dudhale

Solapur, 10 August : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांचा शब्द आजही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रमाण मानला जातो. मोहोळ तालुक्याच्या राजकारणात काय चाललं आहे, याच्याशी मला काही देणंघेणं नाही. पण राजन पाटील हे वडिलधारी असून आगामी काळात तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधारी पक्ष म्हणून जे जे निर्णय होतील, ते राजन पाटील यांच्या सूचनेनुसारच होतील, असा शब्द भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जाहीरपणे माजी आमदार राजन पाटील समर्थकांना दिला.

मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील विकासकामांचे उद्‌घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी भाजप आमदार तथा फडणवीसांचे निकटवर्तीय सचिन कल्याशेट्टी यांना माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) गटाकडून निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात भाजप नेत्याला उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला प्रथमच बोलविण्यात आले होते. त्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. सोलापूर शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि भाजप नेत्याची या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती ही मोहोळ तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, अनगरचे राजन पाटील कुटुंबीय आणि कल्याणशेट्टी परिवाराचे खूप जुने संबंध आहेत. माजी आमदार राजन पाटील यांचा शब्द आजही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रमाण मानला जातो. मोहोळ तालुक्याच्या स्थानिक राजकारणाबाबत मला काही बोलायचे नाही. पण, राज्यातील सत्ताधारी महायुती म्हणून जिल्ह्यात जे निर्णय होतील, ते राजन पाटील यांच्या विचारानेच होती.

राजकारणात चढउतार येत असतात. पण दिलेला शब्द खरा करणारे नेते म्हणून राजन पाटील यांची ओळख आहे. राजन पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे किती प्रेम आहे, हे मी स्वतः अनुभवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राजन पाटील यांच्या शब्दाला मान देतात, असेही सचिन कल्याणशेट्टी यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान, मोहोळ तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच दोन प्रबळ गट आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यातून विस्तवही जात नाही. पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेऊन राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत उमेदवार पडण्यामागे उमेश पाटील यांचा हात असूनही पक्षाकडून त्यांना जिल्हाध्यपक्षदी संधी देण्यात आली आहे, त्यामुळे राजन पाटील गट नाराज असल्याचे दिसून येत आहे, त्यातूनच राजन पाटील गटाने तालुक्यात कल्याणशेट्टी यांना बोलावल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT