Ajit Pawar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवारांचा कोल्हापुरात नवा गौप्यस्फोट, म्हणाले, '' उध्दव ठाकरेंचं सरकार पडत होतं...''

Deepak Kulkarni

Kolhapur : खरं तर आज मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो, उध्दव ठाकरेंचं सरकार पडत होतं. त्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच्या सगळे आमदार एखादं दुसरा राहिला असेल पण त्यांनी एक पत्र तयार केलं आणि नेत्यांना दिलं होतं. आपण महायुतीत सामील होऊ असं या सगळ्या आमदारांचं म्हणणं होते. हे जर खोटं असलं तर राजकारणातून निवृत्त होईल असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. आणि जर खरं असलं तर त्यांनी राजकारण सोडायचं असं आव्हान त्यांनी शरद पवार गटाला दिलं.

आता शरद पवारांच्या(Sharad Pawar) कोल्हापुरातील सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार गटाने रविवारी कोल्हापुरात सभा घेतली. यासभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटावर निशाणा साधला. ते म्हणाले. लोककल्याणकारी योजना तळागळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचायला हव्यात. लोकहिताला प्राधान्य हाच आमचा मार्ग आहे. त्याकरिताच आम्ही महायुतीत सामील झालो असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही सरकारमध्ये नव्हतो, विरोधी पक्षात नव्हतो. त्यामुळे आम्हांला काही करता येत नव्हते. पण आता सरकारमध्ये सामील झालो. हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) भाषणात कोल्हापुरातील तरुणांना, महिलांना रोजगार मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. पण नुसतं भाषण देऊन काही होत नाही. त्यासाठी मोठमोठ्या कंपन्या, आयटी हब शहरात यायला पाहिजे. पण आता कंपन्या येण्यासाठी वातावरण निर्माण करावे लागणार आहे असेही अजितदादांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरी बसता येत नाही. आम्ही काम करणारे नेते आहोत. आज देखील माझा दिवस सकाळी सहाला सुरू होतो आणि रात्री अकराला संपतो. आम्ही जर काम करत असू तर का आम्हांला महाराष्ट्राने पाठिंबा द्यायचा नाही. कशात आम्ही कमी पडतो. तुम्हांला दिलेला शब्द पाळतो असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच कोल्हापुरात सगळ्या जाती, धर्मातील लोकं गुण्यागोविंदाने राहतात. पण जर कुणी जातीपातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सरकारमध्ये असलो तरी हा प्रयत्न हाणून पाडू असेही अजित पवार (Ajit Pawar) ते म्हणाले.

कुठलाही स्वार्थ साधण्यासाठी आम्ही महायुतीत गेलेलो नाही. तर विकासकामांसाठी आम्ही सत्तेत गेलो आहे. घरी बसून काम पूर्ण होत नाही. राज्यातला विकास कसा पूर्ण होईल यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालो आहे असेही पवार म्हणाले. आम्ही नकारात्मक राजकारण करत फक्त दूषणं देणं हे माझं आणि माझ्या सहकार्यांचं काम नाही. संधी मिळाल्यावर लोकांची कामे केली पाहिजे असेही ते म्हणाले.

आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाने डोकं वर काढलं आहे. पण आता यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे तिघेही मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण मार्ग काढत असताना इतर दुर्बल घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. शाहू महाराजांनी त्याकाळी आरक्षण दिलं.

आता मराठा समाजातील आमदार, मंत्री, शिक्षण संस्थांचे संचालक, साखर कारखान्याचे संचालक असू शकतो. पण आजही या समाजातील मोठा वर्ग मोलमजुरीच्या कामाला जातो. म्हणूनच मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कुठलाही प्रश्न हा चर्चेतून सोडवता येतो असेही अजित पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT