Sujat Ambedkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sujat Ambedkar : ‘फडणवीस सरकारने मराठ्यांची फसवणूक केलीय; आरक्षणाचा जीआर सुप्रीम कोर्टात टिकणारच नाही’

Vanchit Bahujan Aaghadi : सुजात आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचा जीआर तकलादू असल्याचे सांगितले. बाळासाहेब आंबेडकर यांनी तो फाडून सरकारची फसवणूक उघड केली. तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असा दावा केला.

विश्वभूषण लिमये
  1. मराठा आरक्षणावर टीका – सुजात आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाचा जीआर टिकाऊ नसल्याचा दावा करत राज्य सरकारवर फसवणुकीचा आरोप केला.

  2. स्थानिक प्रश्न आणि निवडणूक आवाहन – अक्कलकोटमधील पाणीटंचाई, वाळूचोरी, व्होटचोरी यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष देत स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी दुप्पट मेहनत करण्याचे आवाहन केले.

  3. सामाजिक ऐक्य व विरोध – एनआरसी, सीएए, यूएपीए याविरोधात सर्व वंचित आणि मुस्लिम समाजाने एकत्र येण्याचे आवाहन करत संघटनात्मक लढाईवर भर दिला.

Solapur, 15 September : मराठा आरक्षणाचा जीआर (परिपत्रक) जेव्हा निघाला, त्याच्या पुढच्या क्षणाला बाळासाहेब आंबेडकर यांनी तो फाडून टाकला होता आणि सांगून टाकलं होतं की, हा तकलादू जीआर आहे. राज्य सरकारने मराठा बांधवांची फसवणूक केली आहे. हा तकलादू जीआर सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, असा दावा सुजात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट (Akkalkot) येथील वंचित बहुजन आघाडीच्या युवा एल्गार सभेत सुजात आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपणाला येडे समजतात. मराठा समाजाला आंदोलन करायला लावणारे कोण आहेत, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. भाजपपेक्षा मूर्ख बनवणारं एक संघटन आहे, त्याचं नाव गोदी मीडिया आहे. मराठा आरक्षणाचे जीआर काढून देवेंद्र फडणवीस यांचे सगळीकडे बॅनर लावण्यात आले.

जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा जीआर काढला, तेव्हा रोहित पवार यांनी प्रश्न विचारला होता की, पैसे कुठून आले. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्र लुटून खाल्ला आहे, हे सर्व राज्याला माहिती आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मिळालं पाहिजे ही भूमिका वंचितने जाहीर केली आहे, असे सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी स्पष्ट केले.

सुजात आंबेडकर म्हणाले, अक्कलकोटची एमआयडीसी बंद झाली आहे. अक्कलकोट शहरात सात दिवसाड पाणी येते. आपल्या मूलभूत प्रश्नावर आपण बोलू नये; म्हणून त्यांनी आपणाला जातीत आणि धर्मात अडकवून ठेवलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपणाला दुप्पट काम करायचं आहे. कारण, आपणाला इकडच्या झोपलेल्या पोलिस आणि निवडणूक आयोगाला जागं करायचं काम करायचं आहे.

वाळूचोरी होते. पाणीचोरी होते. मात्र, आपल्याकडे आता व्होटचोरीही होते आहे. आपली लढाई झोपलेले पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात लढाई आहे. तरुणांनी जर हातात घेतलं तर एका दिवसात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आपला होऊ शकतो, हे नेपाळनं दाखवून दिलं आहे. अक्कलकोट आणि सोलापूर हा आंबेडकरवाद्यांचा बालेकिल्ला आहे, हे आपणाला दाखवून द्यायचं आहे. आपले जे तिकडे गेले आहेत, त्यांना मारून मुटकुन इकडे आणा आणि त्याची सुरुवात अक्कलकोटपासून करूयात, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

सुजात आंबेडकर म्हणाले, एनआरसी आणि सीएएचा मुद्दा हा फक्त मुस्लिमविरोधी नसून ‘वंचित’च्याही विरोधात आहे. ‘यूएपीए’ कायद्याच्या विरोधातही ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केस लढली होती, या गोष्टी मुस्लीम समाजाने लक्षात ठेवाव्यात. जेव्हा वक्फ बोर्डचा मुद्दा आला, जळगाव-जामनेरमध्ये मुस्लिम मॉब लिंचिंगवेळी बाळासाहेब आणि वंचित उभी राहिली होती.

आंबेडकर म्हणाले, टिपू सुलतानचे स्टेट्स ठेवणाऱ्यांना मारहाण होत होती, तेव्हा बाळासाहेब आंबेडकर यांनी याच अक्कलकोटमध्ये टिपू सुलतानच्या फोटोला हार घातला आणि तुमच्यात दम असेल तर थांबवून बघा म्हटलं.

संग्राम जगताप या पूर्वश्रामीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि आत्ताच्या भाजप आमदारने भाजपच्या मालकांना खुश करण्यासाठी अक्कलकोटमध्ये येऊन मुस्लिम समाजविरोधात भाषण केलं. संग्राम जगताप यांना आत्तापर्यंत नगरमधील मुस्लिम समाजाने आमदार केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माघार घ्यायची नाही, हे आता आपलं ठरलं आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

प्र.1: सुजात आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत काय म्हटले?
उ. – तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असा दावा केला.

प्र.2: अक्कलकोटमधील प्रमुख स्थानिक समस्या कोणती आहे?
उ. – पाणीटंचाई, वाळूचोरी आणि व्होटचोरी.

प्र.3: एनआरसी आणि सीएएबद्दल सुजात आंबेडकर यांची भूमिका काय आहे?
उ. – हा फक्त मुस्लिम नव्हे तर वंचित समाजाविरोधातील मुद्दा असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT