Dhananjay Mahadik direct pipeline project kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik News : थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरकरांना का मिळत नाही? महाडिकांनी सत्य आणलं समोर

Rahul Gadkar

कोल्हापूर : 13 मार्च | लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक गेल्या 13 वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात थेट पाईपलाईनचा मुद्दा नेहमीच गाजत असतो. यंदाच्या निवडणुकीत थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील ( Satej Patil ) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या थेट पाईपलाईन वरून पुन्हा एकदा बंटी आणि मुन्ना यांच्यात सामना रंगला आहे. कोल्हापूर विमानतळ टर्मिनल इमारतीच्या मुद्द्यावरून श्रेयवाद रंगला असताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील थेट पाईपलाईनच्या कामकाजात आपण उडी घेणार असल्याचे जाहीर केले होते. बुधवारी ( 13 मार्च ) थेट पाईपलाईनच्या पुईखडी येथील पाण्याच्या प्रकल्पाला भेट देऊन पाणी अजून कोल्हापूरला का मिळत नाही, याचे सत्यच समोर आणले आहे.

"थेट पाईपलाईच्या योजनेला केंद्र सरकारकडून 60% राज्य सरकारकडून 20% आणि महानगरपालिकेकडून 20% असा निधी देण्यात आला आहे. या ठिकाणी मी कोणतेही श्रेय घेण्यासाठी भेट दिलेली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर शहरात पाण्याची वानवा सुरू आहे. त्यासाठी मी येथे आलो आहे," असे महाडिकांनी ( Dhananjay Mahadik ) म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"यंत्रणाच अस्तित्वात नाही"

"दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करून ही योजना पूर्ण झाली, अशी ग्वाही माजी पालकमंत्र्यांनी दिली होती. मात्र, येथे आल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की पाणी येथे आले आहे. पण, येथून पुढे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणाच अस्तित्वात नाही, असा धक्कादायक प्रकार समोर आला," असं महाडिकांनी सांगितलं.

"लोकांची दिशाभूल का केली?"

"अधिकारी म्हणतात की येथून पुढे दोन महिने यावर काम करून आम्ही पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा जोडणार आहोत. हे सर्व तयार नव्हतं तर तुम्ही उद्घाटनाची गडबड का केली? त्यामध्ये येऊन अंघोळ का केली? लोकांची दिशाभूल का केली?" असा सवाल महाडिकांनी सतेज पाटलांना ( Satej Patil ) केला आहे.

"भाजपच्या वतीने पाच करोड रुपये मंजूर"

"थेट पाईपलाईनचे पाणी चालू होणार म्हणून शिंगणापूरची जुनी पाणी योजना बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारची अमृत योजना पूर्ण क्षमतेने झाल्याशिवाय हे पाणी संपूर्ण शहराला मिळणार नाही. या योजनेसाठी 12 पैकी केवळ चार पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत, आणखी आठ बाकी आहेत. हे सर्व काम अपूर्ण असताना एवढा कांगावा का करण्यात आला? ही यंत्रणा पूर्ण करण्यासाठी जी काही मदत लागेल, त्यासाठी आम्ही तयार आहोत. भाजपच्या वतीने पाच करोड रुपये मंजूर केले आहेत. त्याचे कंत्राट देखील मंजूर करण्यात आले आहे," असं महाडिकांनी स्पष्ट केलं.

"भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करणार"

"या योजनेत दोन बाबी तपासाव्या लागतील. येथील काही ग्रामस्थांनी सांगितलं की, 'येथे केवळ चर खांदून पाईपलाईन्स बुजवण्यात आल्या आहेत.' त्यामुळे या सगळ्या पाईपलाईन्स उकरून तपासून पाहणार आहोत. ज्या पद्धतीने याचे काम होणे अपेक्षित होते ते झाले आहे का? याचा कंत्राटदार कोण आहे, हे देखील आम्हाला अद्याप माहीत नाही. या संदर्भात आम्ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करून समिती नियुक्त करून चौकशी करायला लावणार आहे," असा इशारा महाडिकांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT