Dilip Mane-Siddhanath Sugar Factory  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Siddhanath Sugar Factory : कंचेश्वर विकला,सिद्धनाथ अडचणीत; ‘दक्षिण’च्या मोहिमेवर निघालेल्या मानेंपुढे संकटांची मालिका...

Dilip Mane News : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि दिलीप माने यांची भेट नेमकी कशासाठी झाली? याची चर्चा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रंगली आहे

Anand Surwase

Solapur News : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या तिऱ्हे येथील फार्महाऊसला भेट दिली. माने हे विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. परंतु उमेदवारीसाठी पक्ष कोणता हे मात्र गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे, माने यांच्या सिद्धनाथ साखर कारखान्याचा ताबा पंजाब नॅशनल बँकेने घेतल्याची नोटीस प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि दिलीप माने यांची भेट नेमकी कशासाठी झाली? पक्ष प्रवेशासाठी की कारखान्याचा ताबा रद्द करण्यासाठी अशी चर्चा सोलापुरात रंगू लागली आहे. (Dilip Mane's Siddhanath Sugar Factory was taken over by Punjab Bank)

माजी आमदार दिलीप माने यांचा तुळजापूर तालुक्यातील कंचेश्वर साखर कारखाना तोट्यात गेल्यानंतर त्याची विक्री करण्यात आली. त्यानंतर आता त्यांचा उत्तर सोलापूर तालुक्यातील सिद्धनाथ साखर कारखानाही अडचणीत आला आहे. सिद्धनाथ कारखान्याच्या थकीत कर्जापोटी पंजाब नॅशनल बँकेने कारखान्याला ताबा नोटीस बजावली आहे. या नोटिशीच्या माध्यमातून बँकेने सिद्धनाथ शुगरच्या मालमत्तेच्या व्यवहारांवर निर्बंध लागू केले आहेत. तत्पूर्वी अजित पवार यांनी दिलीप माने यांच्या फॉर्म हाऊसला भेट दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांची हुरडा पार्टी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. या दौऱ्यातच पवारांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर भेटीसाठीचा वेळ राखीव ठेवला होता. माने यांनी पवार यांना हुरडा पार्टीसाठी आमंत्रित केले होते. अजित पवार हे माने यांची भेट घेऊन बारामतीला पोहोचतात, तोपर्यंतच माने यांचा कारखान्याच्या मालमत्तेचा पंजाब नॅशनल बँकेने ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध झाली. याची खबर जनतेत वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिलीप माने यांची भेट नेमकी कशासाठी झाली. पक्ष प्रवेशासाठी की कारखान्याचा ताबा नोटिशीप्रकरणी झाली, या संदर्भातील तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

पंजाब नॅशनल बँकेची 32 कोटींची थकबाकी

दुष्काळाचे सावट असल्याने या वर्षी जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांच्या साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. असे असताना उत्तर सोलापूर तालुक्यातील सिद्धनाथ कारखाना थकीत कर्जप्रकरणी अडचणीत आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा कारखाना माजी आमदार माने यांचा असून पंजाब नॅशनल बँकेने कारखान्याशी संबधित संचालक मंडळाच्या नावे असलेल्या मालमत्तेचा ताबा घेतल्याची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे.

मालमत्तेसंदर्भात व्यवहार न करण्याचे निर्देश

सिद्धनाथ साखर कारखान्याने 2021 मध्ये पीएनबी बँकेकडून 32 कोटी 30 लाख 1911 रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी कारखान्याला नोटीस बजावण्यात आली होती. नोटिशीनंतर 60 दिवसांची मुदत संपली तरीही कारखान्याकडून रक्कम भरली गेली नाही, त्यामुळे बँकेकडून कर्जदार सिद्धनाथ साखर कारखान्याच्या जामीनदारांकडून कर्जाची परतफेड न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, बँकेकडून सिद्धनाथ साखर कारखान्यासह गहाण ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचा 29 जानेवारी 2024 रोजी ताबा घेण्यात आला आहे. या संदर्भात बँकेने ताबा घेतल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. सिद्धनाथ साखर कारखान्याचा आणि इतर मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर पीएनबी बँकेकडून कर्जाची संपूर्ण व्याजासह वसुली होईपर्यंत या मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार न करण्याचे निर्देश दिले आहेत.

माने यांचा तुळजापूर तालुक्यातील कंचेश्वर साखर कारखाना तोट्यात असल्याने या गाळप हंगामापूर्वीच त्याची विक्री करण्यात आली. त्यानंतर आता सिद्धनाथ कारखानाही अडचणी आला आहे. त्यातच दिलीप माने यांना मागील दोन टर्म विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. आता तिसऱ्यांदा पुन्हा दक्षिण सोलापूरमधून लढण्याची तयारी करत असतानाच कारखाना अडचणीत आल्याने मानेंची कोंडी झाली आहे.

दिलीप माने हे 2009 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी पक्ष बदलला आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेकडून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र तिथेही त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधली. मात्र, पक्ष प्रवेश व्हायच्या आधीच महाविकास आघाडी सरकार गेले आणि राष्ट्रवादीही फुटली. त्यामुळे माने यांनी पक्ष प्रवेशाच्या निर्णयाला ब्रेक लावला. दरम्यान, माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. मात्र, त्यांच्या मनात दुसरेच काही तरी शिजत असल्याचे दिसून येत आहे.

माने यांनी मध्यंतरी आमदार रोहित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेस प्रवेशासंदर्भात हालचाली झाल्या. सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत एक दोन कार्यक्रमामध्ये उपस्थितीही दिसून आली. मात्र, पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी अद्याप आपला निर्णय घेतला नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांना हुरडा पार्टीसाठी फार्महाऊसवर पाचारण केल्याने माने यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, असा सवाल कार्यकर्त्यांनाही पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT