सोलापूर : विख्यात मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा मुसळे माने हिला आज (गुरुवारी) न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. पोलिसांच्या मागणीवरुन पोलिस कोठडीचे अधिकार राखून मनीषाला न्यायालयीन कोठडी दिली आहे. मनीषा तपासात सहकार्य करत नाही, उडवाउडवीची उत्तरे देत असून जाणिवपूर्वक माहिती सांगण्यास टाळाटाळ करत आहे. अजून काही साक्षीदारांकडे तपास करून नवीन गोष्टीचा उलगडा झाल्यावर पुन्हा त्याचा मनीषाकडे तपास करावा लागेल, असे कारण पोलिसांनी न्यायालयास सांगितले आहे. त्यामुळे वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन आणि पोलिस कोठडीचा खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. दुसऱ्या दिवशी १९ एप्रिल रोजी डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे वळसंगकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली. या प्रकरणात मनीषाला सुरुवातीला तीन दिवसांची, त्यानंतर दोन अशी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या पोलिस कोठडीच्या कालावधीत पोलिसांच्या हाती ठोस पुरावा न लागल्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करण्याचे कारण देऊन १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. त्यावेळी पोलिसांनी पोलिस कोठडीचे अधिकार स्वत:कडे राखीव ठेवले होते. पण, त्या १४ दिवसांत एकदाही पोलिसांनी तिची कोठडी घेतली नाही. त्या काळात देखील पोलिसांना ठोस असे काहीही हाती लागले नाही.
दोन दिवसांपूर्वी मनीषाच्या तीन बॅंक खात्यातील रक्कम व मोबाईलच्या फोन पेवर झालेले तीन वर्षातील व्यवहार, याचा आधार घेत पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणाला आर्थिक वळण दिले. त्यावर पोलिसांना न्यायालयाकडून मनीषाची दोन दिवस पोलिस कोठडीत देण्यात आली. पोलिस कोठडी संपल्यानंतर आज तिला पुन्हा न्यायालयात उभे करण्यात आले होते. नियमित कोर्टाचे न्यायाधीश विक्रमसिंह भंडारी रजेवर असल्याने न्यायाधीश एस. एन. रथकंठवार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. पोलिसांनी पुन्हा मनीषाच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यावेळी पुन्हा एकदा पोलिस कोठडीचे अधिकार राखून ठेवले. २७ मेपर्यंत मनीषा आता न्यायालयीन कोठडीत राहील.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गृहकलह असल्याचे त्यांचे निकटवर्तीय खाजगीत मान्य करतात, यामागे त्यांच्या कुटुंबातील जवळच्याच महिला व्यक्तीवर त्यांचा रोष होता. मात्र, पोलिसांनी त्या बाजूने तपास केलेला नाही, असे दिसत आहे. पोलिस म्हणतात, कोणाकडे पुरावे असतील तर आम्हाला द्या, आम्ही त्यानुसार तपास करायला तयार आहोत. पण, पोलिस स्वत:हून इतर बाबींच्या तपासाला बगल देत असल्याचा आरोप करून काहींनी सीआयडी तपासाची देखील मागणी केली आहे.
मनीषा मुसळे माने हिच्या आर्थिक त्रासामुळे आणि त्यातून डॉ. शिरीष वळसंगकर यांना दिलेल्या धमकीतून डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांचा आहे. मात्र, कोट्यावधींची मालमत्ता असलेले डॉ. वळसंगकर हे आर्थिक बाबींवरून आत्महत्या करतील, हे त्यांच्या निकटवर्तीयांना मान्य नाही. डॉ. वळसंगकर यांना कौटुंबिक त्रासाला समोर जावे लागत होते, त्यामागे त्यांची सून डॉ. शोनाली असल्याचीही चर्चा आहे. पोलिसांनी त्या बाजूने तपास करावा, अशी त्यांना अपेक्षा आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला आता जवळपास महिना होत आला आहे. तपास सुरु झाल्यापासून जास्तीत जास्त ९० दिवसांत न्यायालयात चार्टशीट दाखल करावे लागणार आहे. घटनेला महिना होऊनही पोलिसांना अद्याप ठोस पुरावे मिळू शकले नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून दिसून येते. त्यामुळे चार्टशीट दाखल करेपर्यंत मनीषा मुसळे माने हिचा पोलिस आणि न्यायालय कोठडीचा खेळ सुरूच राहणार अशी सद्य:स्थिती आहे.