Ranjit Singh Disale
Ranjit Singh Disale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

डिसले गुरुजी अडकले आपल्याच चक्रव्यूहात; शिक्षण विभागाने मागितला या गोष्टींचा खुलासा!

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disale) आता आपल्याच आरोपामुळे अडचणीत सापडले आहेत. रजेसाठी आपल्याकडे पैशांची मागणी झाली होती आणि दीड महिने रजेचा अर्ज प्रलंबित ठेवला होती, या दोन्ही आरोपांचे उत्तर आता त्यांना पुराव्यानिशी द्यावे लागणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याबाबतचे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून डिसले गुरुजींना पाठविले आहे. (Education department has asked Disale Guruji clarification of allegations)

डिसले गुरुजींनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी किंवा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना थेट निमंत्रण दिले होते. प्रशासनाला त्यासंबंधीची माहिती राज्यपालांचा दौरा ठरल्यानंतरच मिळाली. त्यामुळे तेथील कार्यक्रमांचा खर्च कुणी करायचा, हा मुद्दा उपस्थित झाला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान, शिष्यवृत्तीसाठी अमेरिकेला जाण्याकरिता रजा मिळावी, असा अर्ज डिसले गुरुजींनी ता. 22 डिसेंबर २०२० रोजी कुर्डूवाडी येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केला होता. त्यानंतर डिसले गुरुजींना वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून त्यासंदर्भात पाठविण्यात आलेल्या ई-मेलचा स्क्रिन शॉटही काढून ठेवण्यात आलेला आहे. डिसले गुरुजी हे कागदपत्रांची पूर्तता न करताच रजेचा अर्ज मंजूर करावा, यासाठी 20 जानेवारीला जिल्हा परिषदेमध्ये आले होते. त्यानंतरही त्यांनी आपला रजेचा अर्ज गेली दीड महिन्यापासून प्रलंबित ठेवल्याचा आरोप शिक्षण विभागावर केला होता.

दरम्यान, रजेचा अर्ज मंजूर होण्यासाठी दीड महिने का आणि कसे लागले, याचे उत्तर आता डिसले गुरुजींना द्यावे लागणार आहे. दुसरीकडे, तुमच्याकडून पैसे मागणाऱ्याचे नाव व पुरावे सादर करा, असेही पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून डिसले यांना पाठविले आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली.

डिसले यांनी 22 डिसेंबर रोजी कुर्डुवाडीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे रजेसाठी अर्ज केला होता. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिफारस जोडून 23 डिसेंबर रोजी तो अर्ज डिसलेंकडे दिला. डिसले गुरुजींनी 31 डिसेंबर रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार शिक्षणाधिकाऱ्यांकडे रजेचा अर्ज सादर केला होता. शिक्षणाधिकाऱ्यांनी 4 जानेवारीला कॉल करून, तर 5 जानेवारीला ई-मेल करून कागदपत्रांच्या पूर्ततेसंदर्भात सूचना केली हेाती. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी डिसले गुरूजींना कागदपत्रांच्या पूर्ततेसह प्रस्ताव सादर करण्यासंबंधी 7 जानेवारी रोजी कळविले होते. त्यानंतर डिसले 20 जानेवारीला झेडपीत आले; कागदपत्रांची पूर्तता न करताच रजा मंजुरीची मागणी केली.

माध्यमांना प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही

मला शिक्षणाधिकारी अथवा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कोणत्याही खुलाशाबाबतचे पत्र मिळालेले नाही. त्यांच्याकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यावर उत्तर देईन. परंतु, प्रशासकीय बाबींमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी मांडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT