Eknath Shinde Dilip Sopal Uddhav Thackeray .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politics: वारं फिरलं! एकनाथ शिंदेंनी घेतली उद्धव ठाकरेंच्या आमदारासाठी प्रचारसभा, आठव्यांदा आमदार करण्याचाही दिला शब्द

Barshi ZP Election Politics : बार्शी तालुक्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि बाजार समिती निवडणुकांमध्ये भाजपनं तालुक्यात राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात मोठं यश मिळवलं होतं.

Deepak Kulkarni

Solapur News: शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला होता.उद्धव ठाकरेंना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता,तसेच महाविकास आघाडीचं सरकारही कोसळलं होतं. यानंतर गेली जवळपास पावणेचार वर्ष एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमधून विस्तवही जात नाही, तसेच दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांवर मिळेल तेव्हा टोकाची टीकाच केली जाते. पण आता याचदरम्यान, एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क उद्धव ठाकरेंच्या आमदारासाठीच जाहीर प्रचारसभा घेतल्याचं पाहायला मिळालं.

सोलापुरातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी (ता.4 फेब्रुवारी) उद्धव ठाकरेंच्या आमदारासाठी चक्क प्रचारसभा घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर भाजपला धक्का देत मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. त्यांनी चक्क दोन्ही शिवसेनेला एकत्र आणण्याची किमया घडवून आणतानाच अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचाही पाठिंबाही मिळवला आहे. एकनाथ शिंदेंनी सभा घेतल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीत भाजपसमोर तगडं आव्हान उभं राहिलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे आमदार दिलीप सोपलांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीत मशाल, धनुष्यबाण आणि घड्याळ या तिन्ही चिन्हावर लढणारे उमेदवार एकत्र करुन महाआघाडी तयार करण्यात यश मिळवलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैराग येथे याच महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, दिलीप सोपल यांच्या नेतृत्वात उभारलेल्या सर्व उमेदवारांना विजयी करा. यावेळी त्यांनी वैराग तालुका निर्मिती आणि संतनाथ कारखाना सुरु करण्याचा शब्द तर दिलाच शिवाय स्थानिक विकासकामांना निधी देण्याचं आश्वासनही दिल्याचं पाहायला मिळालं.

तसेच दिलीप सोपल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना ते म्हणाले, सोपल हे सात वेळेस निवडून आले. या विधानसभेला गाडी चुकली. नाहीतर ते मंत्रिमंडळात असले असते असं मोठं विधानही त्यांनी केलं. सोपलं यांचं विधानसभेतलं काम पाहिलेलं असून आपण त्यांना अगदी जवळून अनुभवलं आहे. ते दोन वेळेस विधानसभेत नव्हते.पण तेव्हाही विधानसभेलाही चुकल्यासारखं वाटायचं. सोपल हे राजकारणातले अजातशत्रू असून सगळ्यांचे मित्रही आहेत. आमदार कसा असावा? असं म्हणत त्यांनी दिलीप सोपल यांचं नाव घ्यावं लागेल असंही म्हटलं.

यावेळी एकनाथ शिंदेंनी चक्क उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपलांना पुढील निवडणूक आमच्याकडून आपल्या शिवसेनेकडून लढवण्याची ऑफर देखील दिली. आता सोपल पुढील काळात आठव्यांदा निवडून येतील. 100 टक्के निवडून येतील. मागच्या वेळेस झालेली चूक आपण दुरुस्त करु, असंही शिंदे यावेळी म्हणाले.

एकीकडे आज दु:खाचं सावट आपल्यावर आहे. अजितदादांचं निधन झालं. महाराष्ट्रात शोककळा आहे आणि निवडणूक आहे. आमच्या निवडणुका झाल्या. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची अपेक्षा असते, नेत्याने आमच्यासाठी देखील यावं. मी त्यांच्या पाठिशी उभा राहणारा कार्यकर्ता असल्याचं मतही शिंदेंनी आपल्या भाषणात व्यक्त केलं.

दिलीप सोपल म्हणाले, बार्शीतील महाआघाडीच्या प्रचारासाठी शिंदेसाहेब याठिकाणी आले आहेत. आपली ख्याती बोले तैसा चाले अशी आहे. मात्र, आम्ही तुमच्या खांद्यावर कामाचा डोंगर देत नाहीत. फक्त पाठिंबा आणि आशीर्वाद महाआघाडीच्या उमेदवारांना लाभावा, असंही सोपल यांनी म्हटलं.

तसेच ही महाआघाडी आम्ही बार्शीतील विध्वंसक प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी निर्माण केल्याचंही त्यांनी सांगितलं. जनतेची वैराग तालुका व्हावा, ही अनेक वर्षांची मागणी आहे. मंत्रिमंडळात हा विषय आल्यावर तुम्ही त्याला मंजुरी द्यावी अशी मागणीही सोपल यांनी यावेळी केली.

बार्शी तालुक्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि बाजार समिती निवडणुकांमध्ये भाजपनं तालुक्यात राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात मोठं यश मिळवलं होतं. त्यांची वाढती ताकद रोखण्यासाठी सोपलांनी हा महाआघाडीचा डाव टाकल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT