Kolhapur News : आगामी स्थानिकच्या तोंडावर पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जादू पहायला मिळाली आहे. तर त्यांचे ऑपरेश टायगर यावेळी कोल्हापूरमध्ये यशस्वी झाले आहे. आज मंगळवार (ता.24) शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते शारंगधर देशमुखासह दोन माजी महापौर एक उपमहापौर आणि 21 माजी नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे शिंदे यांनी एकाच वेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, भाजप आणि ताराराणी आघाडीला जोरदार धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रवेशावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थितीत होते. (Eknath Shinde welcomes Congress leaders including Sharangdhar Deshmukh and former mayors into Shiv Sena)
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंनी आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकडे लक्ष घातलं होतं. यामुळे अनेक स्थानिक नेते आता शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. यावेळी त्यांनी सगळ्यात मोठा धक्का हा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना दिला आहे. तर त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शारंगधर देशमुखांनाच त्यांनी फोडलं आहे. तसेच त्यांनी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, उपमहापौर दिंगबर फराकटे यांच्यासह तब्बल 21 माजी नगरसेवकांना पक्षात घेतलं आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढली असून काँग्रेस आणि भाजपसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवा, हा एकनाथ शिंदे तूमच्या पाठीशी आहे. विकास कामासाठी कोणताही निधी लागेल, तो द्यायला मी तयार आहे. फक्त तुम्ही सेवा करण्याची तयारी ठेवा. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न कोल्हापूर महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचे होते. ते आता आपण मिळून पूर्ण करूया.
आज येथे सगळं कोल्हापूर धूऊन आलं आहे, पुढच्या टप्प्यात ही अनेकांचे पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेतही यावेळी शिंदेंनी दिले आहेत. तसेच सत्ता आणणारे किंगमेकर आता इकडे आहेत. ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरवर भगवा फडकवला तसा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील भगवा फडकवा असा कानमंत्र प्रवेश केलेल्या नेत्यांना दिला आहे. आता एक दिलाने जसा करेक्ट कार्यक्रम केला तसात पुढच्या टप्प्यात अनेक करेक्ट कार्यक्रम करायचे आहेत. शिवसेना हे मालक आणि नोकरांची सेना नाही ही कार्यकर्त्यांची सेना असल्याचा टोला देखील त्यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी देखील कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवायचा असून अनेक मातब्बर प्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर दक्षिण नव्हे तर पूर्व पश्चिम भागावर देखील फडकल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटलं आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणूक तोंडावर सतेज पाटलांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शारंगधर देशमुख यांनीच त्याची सोथ सोडली आहे. त्यांनी थेट कट्टर विरोधक असणाऱ्या राजेश राजेश क्षीरसागर यांच्याशी हात मिळवणी केली आहे. ते एकटेच गेले नाहीत तर काँग्रेसचे महत्वाचे चेहरे फोडले आहेत. त्यांच्याबरोबर माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, उपमहापौर दिंगबर फराकटे हे शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी सतेज पाटलांना नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.
सत्यजित कदम यांनी भाजपसह ताराराणी आघाडीतील काही नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेच घेतलं आहे. त्यांच्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे आता कोणताही प्रमुख चेहरा नसल्याने भाजपसह ताराराणी आघाडीतील माजी नगरसेवकांनी शिवसेनेची वाट निवडल्याची चर्चा आहे.
देशमुखांसह माजी महापौर सुनील कदम, माजी महापौर निलोफर आजगेकर, संभाजी जाधव, सीमा कदम, कविता माने, अर्चना पागर, सुनंदा मोहिते, पूजा नाईकनवरे, भरत लोखंडे, आनंदराव खेडकर, अश्विनी बारामते, गीता गुरव, संगीता सावंत तर काँग्रेसमधील निलोफर आजरेकर, प्रतिभा नाईकनवरे, प्रकाश नाईकनवरे, दिगंबर फराकटे, जहाँगीर पंडत, रिना कांबळे यांचे प्रवेश झालेत. तर राष्ट्रवादीचे रशीद बारगीर, अनुराधा खेडकर, शिवसेनेचे अभिजीत चव्हाण यांचाही प्रवेश झाला आहे. दरम्यान आता काँग्रेसमधील प्रवेश केलेल्या नगरसेवकांचा गट पाहता आजच्या प्रवेशामागे विधानसभा निवडणुकीतील परिणामांची किनार दिसत आहे. तर राष्ट्रवादीतून झालेल्या प्रवेशामागे कोणाची शक्ती लागली यावरून श्रेयवाद रंगणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.