Ishwarpur Municipal Council Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shiv Sena News: 'सत्तेचा निर्णय अंतिम नसतो!' एकनाथ शिंदेंनाच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचं आव्हान; थेट हायकोर्टात धाव!

Ishwarpur Municipal Council Politics:एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयकर जाधव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Sangali News: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश एकनाथ शिंदे यांनी रद्द केला होता.

या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख जयकर जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामुळे नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा वाद पुन्हा न्यायालयात पोहोचला असून, शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याने पक्षप्रमुखांच्या निर्णयाला आव्हान दिल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.

ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्याविरोधात जयकर जाधव यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ४४ (१) (ई) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. गुंठेवारी नियमितीकरण प्रमाणपत्रातील अट क्रमांक १२ नुसार सेटबॅक क्षेत्रातील बांधकाम हटविणे आवश्यक असल्याचा मुद्दा जयकर जाधव यांनी आपल्या तक्रारीत उपस्थित केला होता. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात संबंधित बांधकाम सर्व्हे क्रमांक ११ मध्ये असल्याचे नमूद करण्यात आल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे.

या तक्रारीवर सुनावणी घेत जिल्हाधिकाऱ्यांनी १० जुलै २०२६ रोजी मलगुंडे यांना अपात्र ठरविले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाविरोधात मलगुंडे यांनी राज्य शासनाकडे अपील केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ नोव्हेंबर रोजी हा आदेश रद्द करत मलगुंडे यांना दिलासा दिला होता. आता शिंदे यांच्या याच निर्णयाविरोधात जाधव यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ३० जुलै रोजी तक्रारदारांचा युक्तिवाद न ऐकताच अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याचा आक्षेप जाधव यांनी घेतला आहे.

एकनाथ शिंदेंनी कोणत्या आधारावर रद्द केली अपात्रता?

मुंबई उच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबर रोजी राज्य सरकारला दोन आठवड्यांच्या आत मलगुंडे यांच्या अपिलावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. निर्धारित मुदतीत निर्णय न घेतल्यास अंतरिम स्थगिती आपोआप उठेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर १३ नोव्हेंबर रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मलगुंडे यांचे अपील मंजूर करत जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा आदेश रद्द केला.

महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियमातील कलम ४४ मधील अपात्रतेच्या तरतुदी नगरसेवकांसाठी असून, त्या थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना लागू होत नाहीत, असे निरीक्षण या निर्णयात नोंदविण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना पदावरून हटविण्यासाठी कलम ५५-१ आणि ५५-अ लागू असल्याचा निष्कर्षही नगरविकास मंत्र्यांनी नोंदविला होता.

शिंदे यांच्या याच कायदेशीर निष्कर्षाला जयकर जाधव यांनी आता उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधातील वैयक्तिक संघर्ष नसून कायद्याचे राज्य आणि पारदर्शक प्रशासनासाठी असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी करून दिलेला अपात्रतेचा आदेश मंत्र्यांनी कोणत्या कायदेशीर आधारावर रद्द केला, याची न्यायालयीन तपासणी होणे आवश्यक आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ही लढाई शेवटपर्यंत सुरू ठेवू. सत्तेचा निर्णय अंतिम नसतो; कायद्याचा निर्णय अंतिम असतो, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT