Patan, 23 April : भारतीय जनता पक्षासारख्या सर्वार्थाने बलाढ्य असलेल्या भाजपच्या तगड्या उमेदवाराला चीतपट करून ती वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी सातारा जिल्हा परिषदेत पोचली. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गटातून जिंकून आलेल्या मृणाल महेश पाटील हिचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारच्या सभेत जाहीरपणे कौतुक केले.
मृणाल महेश पाटील ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर पाटण (Patan) तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तगड्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकली आहे. बनपुरी हे मृणाल पाटील हिचे मूळगाव आहे. उद्योजक महेश पाटील यांची मृणाल ही मोठी कन्या आहे.
ता. ११ मार्च २००३ रोजी जन्मलेल्या मृणालचे दहावीपर्यंतचे शिक्षण कऱ्हाडच्या (Karad) लाहोटी कन्या प्रशालेत झाले. कऱ्हाडमधील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयातून तिने बी. कॉमची पदवी प्रथम श्रेणीत मिळविली आहे. कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तिची टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड झाली होती.
मृणाल पाटील हिने सातारा जिल्हा परिषदेची नुकतीच झालेली निवडणूक शिवसेनेतून मंद्रुळकोळे गटातून लढवली. विरोधात भाजपसारख्या बलाढ्य पक्षाचा उमेदवार होता. पण मृणाल पाटील हिने भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून सातारा जिल्हा परिषदेत एन्ट्री केली.
अवघ्या २२ वर्षी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकणाऱ्या मृणाल पाटील हिची नुकतीच जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. या यशाबद्दल तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृणाल हिचे जाहीरपणे कौतुक केले आहे.
मृणाल पाटील पाटणचे नाव आणखी मोठे करेल : शंभूराज देसाई
मृणालने राज्यात एक नवा इतिहास रचला आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी कमी वयात तिला मिळाली आहे. हा शिवसेना आणि देसाई गटाचा बहुमान आहे. तालुक्याचे आणि गावचे नाव ती आणखी मोठे करेल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.