Maharashtra Loksabha Constituency News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha News : शिंदेंचा शिलेदार करणार इच्छुकांची अडचण; कोणाला बसणार फटका..?

Umesh Bambare-Patil

Satara Loksabha News : महायुतीत सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. येथे मुख्यमंत्री शिंदे गट शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटात रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूचे नेते या मतदारसंघासाठी आडून बसले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी तर, कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून लढणारच अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांची विभागणी होण्याची भिती असून भाजप व राष्ट्रवादीच्या इच्छुकांची अडचण होणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार हे निश्चित आहे. पण, दोन्ही बाजूचे कोण उमेदवार भिडणार हे मात्र, अद्यापही गुलदस्त्यात आहे. प्रत्येकजण विरोधकांचा उमेदवार कोण हे पाहून निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या येथे पारंपारिक पद्धतीने राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले अशी लढत अपेक्षित वाटत आहे. पण, अद्याप दोन्ही बाजूंकडून याबाबत अधिकृत घोषणा नाही.

खासदार शरद पवार महाविकास आघाडीचा उमेदवार विचारपूर्वकच देणार आहेत. सध्या महायुतीत सातारा लोकसभेवरुन राष्ट्रवादी, व शिंदे गट शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेचे नेते या मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरुन बसले आहेत. तर राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्ह्यातील नेत्यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जोर लावला आहे. जिल्ह्यातील शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्हालाच मतदारसंघ मिळणार असे सांगण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून कोणीही अद्याप संपर्क मोहिम सुरु केलेली नाही.

नुकताच मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा झाला. या दौऱ्यातही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सातारा लोकसभेसाठी आपण आग्रही भूमिका घेण्याची विनंती एकनाथ शिंदेंकडे केली आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदेंनीही या मतदारसंघासाठी आग्रही राहण्याची भूमिका घेतली आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनीही सातारा लोकसभेवर आपलाच हक्क असून हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे अजितदादा गट व शिंदेंचा गटात वाद रंगण्याची चिन्हे आहेत. यापुढे जाऊन शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव (Puroshottam Jadhav) यांनी तर आपण रिंगणात असणारच अशी भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेही जोरदार फिल्डिंगही लावली आहे. त्यामुळे महायुतीत तिकिट कोणालाही मिळू पुरुषोत्तम जाधव रिंगणात राहणार असल्याने शिवसेनेची मते विभागणीचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका राष्ट्रवादी व भाजपच्या इच्छुकांना बसण्याची शक्यता आहे.आता भाजपचे नेते कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. पण सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश येणार का, प्रश्न आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच सुटणार आहे.त्यामुळे मी कोणत्याही परिस्थिती रिंगणात असणार आहे. मागील दोन निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी फसवणूक केली आहे.त्यामुळे यावेळेस ते माघार घेणार नाही.मागील दोन निवडणुकीत पडलेली मते लक्षात घेऊन मी यावेळेसही पुन्हा ताकत आजमवणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) पाठबळ मिळणार आहे.

- पुरुषोत्तम जाधव (शिवसेना जिल्हाप्रमुख, सातारा)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT