Makai Sugar Factory Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Makai Sugar Factory : ‘मकाई’ची निवडणूक २१ वर्षांत प्रथमच बागल कुटुंबीयांविना : दिग्विजय अन्‌ रश्मी बागल निवडणुकीतून गायब

कारणे काहीही असली तरी हे बागल गटाच्या दृष्टीने आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे.

आण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा (Karmala) तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता. १८) बागल कुटुंबातील एकाही व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरला नाही. बागल गटाच्या नेत्या मकाई सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्ष रश्मी बागल व माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे दोन्ही बहिण-भाऊ मकाईच्या निवडणुकीत उतरले नाहीत. कारखान्याच्या २१ वर्षांच्या इतिहास प्रथमच बागल कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहे. (Election of Makai Sugar Factory for the first time in 21 years without Bagal family)

मकाई कारखान्यावर स्थापनेपासून बागल गटाची सत्ता आहे. मकाईच्या निवडणुकीत बागल गटातील एकही उमेदवार नसणे, ही तालुक्याच्या राजकारणातील महत्वाची घडामोड समजली जात आहे. सध्या मकाई सहकारी साखर कारखाना मोठ्या आर्थिक अडचणी सापडला आहे, अशा परिस्थितीत ही निवडणूक होत असून या निवडणुकीत बागल कुटुंबातील एकही उमेदवार नसणे याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

माजी राज्यमंत्री (कै.) दिगंबरराव बागल यांनी मोठ्या जिद्दीने मकाई सहकारी साखर कारखाना उभा केला. सन २००० मध्ये झालेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिगंबराव बागल गटाचा पराभव झाला, त्यामुळे बागल यांनी तालुक्यात दुसरा कारखाना उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

मकाई सहकारी साखर कारखाना स्थापन झाला पाहिजे, अशी इच्छा असलेले अप्पासाहेब झांजुर्णे यांना बरोबर घेऊन २ जून २००१ ला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते मकाई सहकारी साखर कारखान्याचे भूमिपूजन करण्यात आले. तर २६ ऑक्टोबर २००२ ला कारखान्याचे काम पूर्ण होऊन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्तेच मकाई कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

आप्पासाहेब झांजुर्णे हे मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते. विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत (कै.) दिगंबरराव बागल यांचा पराभव झाल्यानंतर ते स्वतः मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. त्यानंतर पुढील पंचवार्षिक योजनेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच ५ फेब्रुवारी २००६ रोजी दिगंबरराव बागल यांचे निधन झाले. त्याच्यानंतर विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध दिली.

मकाई कारखान्याची पहिली निवडणूक ता. १३ फेब्रुवारी २००६ रोजी बिनविरोध झाली. दिगंबरराव बागल यांच्या कन्या रश्मी बागल या कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या. या कालावधीत बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत कारखान्याचा कारभार केला. रश्मी बागल यांनी पाच वर्षे कारखान्याचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले.

त्यानंतर २०११ ला झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली आणि निवडणुकीत ते मोठ्या फरकाने विजयी झाले आणि २०११ ला दिग्विजय बागल हे कारखान्याचे पहिल्यांदा अध्यक्ष झाले. त्यानंतर २०१६ ला झालेल्या निवडणुकीतही दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली आणि ते दुसऱ्यांदा कारखान्याचे अध्यक्ष झाले.

स्थापनेपासून बागल गटाची एकहाती सत्ता असलेल्या मकाई कारखान्यात बागल कुटुंबातील एकाही व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल न करणे यामागील कारणे काहीही असली तरी हे बागल गटाच्या दृष्टीने आत्मपरीक्षण करायला लावणारी गोष्ट आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दिग्विजय बागल व संचालिका कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

कारखान्याच्या स्थापनेपासून प्रथमच बागल घराण्यातली उमेदवार निवडणूक लढवत नाही. उमेदवारी कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी कोणत्याही संस्थेच्या थकबाकी असता कामा नये. दिग्विजय बागल व रश्मी बागल यांच्या नावावरती कर्ज थकीत असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नसल्याची चर्चा असली तरी यापाठीमागे आणखी काही तरी राजकारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मकाई कारखान्याच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघातून दिग्विजय बागल यांचे चुलत भाऊ नवनाथ बागल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT