Solapur, 28 February : सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषदा, तसेच महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीतील विजयाचा गुलाल निघण्याआधीच येत्या डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या नगरपंचायतींचे नगराध्यक्ष जनतेतून निवडले जाणार असल्याने मोठी चुरस असणार आहे. पाचपैकी चार नगरपंचायती या माढा लोकसभा मतदारसंघातील, तर तीन नगरपंचायती माळशिरस तालुक्यातील आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते-पाटील असाच सामना रंगण्याची शक्यता आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जानेवारी २०२२ मध्ये माढा, वैराग, नातेपुते, म्हाळुंग-श्रीपूर आणि माळशिरस या नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. या पाचही नगरपंचायतींमध्ये ८५ नगरसेवक असणार आहेत. या नगरपंचायतींची मुदत डिसेंबर २०२६ मध्ये संपत आहे. या नगरपंचायतींचे (Nagar Panchayat) नगराध्यक्ष नगरसेवकांमधून निवडले होते. आता जनतेतून नगराध्यक्ष निवडले जाणार असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस दिसणार आहे.
माळशिरस (Malshiras) तालुक्यातील अकलूज नगरपरिषद, माळशिरस पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक खासदार मोहिते-पाटील विरुद्ध माजी आमदार राम सातपुते अशीच झाली आहे. या निवडणुकीत माजी आमदार सातपुते यांच्या पाठीशी पालकमंत्री जयकुमार गोरे हे सर्वार्थाने खंबीरपणे उभा राहिले असल्याचे दिसते.
सत्तेसह सर्वच ताकदीने मैदानात उतरलेल्या भाजपला रोखण्यात खासदार मोहिते-पाटील यांना यश मिळाले आहे. मोहिते पाटील यांनी या निवडणुकीतून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यात मोहिते-पाटील यांना यश आले असले तरीही पालकमंत्री गोरे आणि माजी आमदार सातपुते यांच्या माध्यमातून भाजपने अकलूज नगरपरिषद, माळशिरस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत प्रवेश केला आहे. मोहिते-पाटील यांच्याशिवाय माळशिरस तालुक्यात भाजप हळूहळू पाय रोवताना दिसत आहे.
माळशिरसनंतर बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी नगरपरिषद, बार्शी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राऊत यांना वैराग नगरपंचायत जिंकून तालुक्यावर भाजपचा निर्विवाद झेंडा फडकविण्याची संधी आगामी काळात येणार आहे.
नगराध्यक्षांचे आरक्षण
माढा : ओबीसी महिला
वैराग : सर्वसाधारण महिला
नातेपुते : सर्वसाधारण महिला
म्हाळुंग-श्रीपूर : सर्वसाधारण महिला
माळशिरस : ओबीसी
मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समर्थकांनी अकलूज नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन्ही राष्ट्रवादीचा जिल्ह्यात मेळ घातला आहे. हा मेळ लावताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रमुख मुद्दा होता. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा जवळपास संपला आहे.
काही दिवसांपूर्वी खासदार मोहिते- पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माळशिसरचे आमदार उत्तम जानकर यांनी उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांची भेट घेतली. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी आमदार जानकर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे आगामी काळात मोहिते- पाटील काय करणार? तुतारी, घड्याळ की बाण निवडणार? याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते, म्हाळुंग-श्रीपूर व माळशिरस नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी मोहिते-पाटील कोणता राजकीय पर्याय निवडणार? यावर जिल्ह्याची नवी राजकीय समीकरणं अवलंबून आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.