Solapur News, 21 Dec : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि न्यायालयाच्या आदेशांनंतर घेण्यात आलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. एकीकडे राज्यभरातील निकालाची प्रतिक्षा लागली आहे.
तर दुसरीकडे निकालापूर्वीच मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीवर अखेर भाजपचंच कमळ फुललं आहे. कारण अनगर नगरपंचायत बिनविरोध घोषित करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
याबाबतचं राज्य निवडणूक आयोगाचं पत्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना आलं आहे. त्यानुसार आज सकाळी जिल्हाधिकारी अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याची घोषणा करणार आहेत. तर या नगरपंचायतीत नगराध्यक्ष आणि १७ सदस्यपदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे.
त्यामुळे बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदीअखेर भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्राजक्ता पाटील या मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या सून आहेत. अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी निवडणुकीच्या आधीपासून या ठिकाणी मोठा वाद झाला होता.
कारण माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात आपणाला उमेदवारी अर्ज भरू दिला जात नसल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे पाटील यांनी केला होता. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, हा अर्ज काही कारणामुळे बाद ठरवण्यात आला.
त्यानंतर राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी उत्साहाच्या भरात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर इशारा दिल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर राजन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांची माफी मागितली. या सर्व नाट्यमय घडामोडीमुळे ही निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती.
मात्र, आता अखेर इथे भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यास आयोगाने मान्यता दिल्यामुळे राजन पाटील समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर अनगरसह भाजप नेते गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जामनेरच्या नगराध्यक्षपदी तर भाजपचे नयनकुंवर रावल दोंडाईचा नगराध्यपदी बिनविरोध निवड झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.