Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Congress : पक्षविरोधात पोस्ट करणे भोवले; काँग्रेसच्या सोलापूर शहर सचिवांची पक्षातून हकालपट्टी

Congress News : त्यांनी २४ तासांत खुलासा करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले होते.

तात्या लांडगे

Solapur News : पक्षाच्या विरोधात सोशल मीडियातून पोस्ट टाकणे काँग्रेसचे सोलापूर शहराचे सचिव राजन कामत यांना चांगलेच भोवले आहे. पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी कामत यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली आहे. (Expulsion of Congress Solapur city secretary from the party)

काँग्रेसचे शहराध्यक्ष नरोटे हे घर घर काँग्रेस, जनसंवाद यात्रा, विविध कार्यक्रम आदींच्या माध्यमातून सोलापूर शहरात काँग्रेस पक्षवाढीसाठी काम करत आहेत. आगामी काळात लोकसभा, महापालिका निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसकडून जनसंपर्कावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सोलापूरची जागा जिंकण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहे. तशी मोर्चेबांधणी पक्षाकडून सुरू आहे.

सोलापूर शहर सचिव राजन कामत मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाच्या विरोधात काही ना काही पोस्ट टाकत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष नरोटे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी कामत यांना त्याबाबत खुलासा करण्याची नोटीस शनिवारी (ता. २३ सप्टेंबर) दिली होती. त्यात त्यांनी २४ तासांत खुलासा करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले होते. त्यानंतरही कामत यांनी रविवारपर्यंत खुलासा दिला नव्हता, त्यामुळे नरोटे यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून कामत यांच्या हकालपट्टीचा निर्णय जाहीर केला आहे.

पक्षाची शिस्त मोडणे, पक्षाच्या अनुशासन नियमांविरुद्ध काम केल्याच्या कारणावरून सोलापूर शहर काँग्रेसचे सचिव राजन कामत यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. कामत यांच्या माध्यमातून नरोटे यांनी पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

काही जण काँग्रेस भवनात दररोज येतात. पण बाहेर आल्यावर पक्षविरोधी वक्तव्य करतात. अशा कार्यकर्त्यांनाही शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी तंबी दिली आहे. आगामी काळात असे घडले आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आल्यास कितीही मोठा पदाधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही नरोटे यांनी सांगितले. तसेच, काँग्रेस पक्षवाढीसाठी कोणी प्रयत्न करत असतील, तर त्यांच्यासोबत आम्ही सदैव राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT