Malkapur Nagarpalika Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Malkapur Nagarpalika : तब्बल 22 वर्षे सत्ता राखलेल्या काँग्रेसच्या गडात भाजपची प्रथमच हवा; पण इच्छुक वाढवणार पक्षश्रेष्ठींचे टेन्शन

Congress Vs BJP News : मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये उमेदवारीची चुरस वाढली आहे. काँग्रेस गोंधळलेली असून शिवसेना उद्धव गटाने चार जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राजेंद्र ननावरे
  1. भाजपमध्ये सर्वाधिक उत्साह: मलकापूरमध्ये २२ वर्षांनंतर भाजपला पोषक वातावरण मिळाले असून एका प्रभागात ५-६ इच्छुक उभे राहिल्याने उमेदवार निवडीसाठी तारेवरची कसरत सुरू आहे.

  2. काँग्रेसची भूमिका अनिश्चित: सत्ता असतानाही काँग्रेसने अद्याप निवडणुकीसाठी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे.

  3. राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत: माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची भूमिका अनिश्चित असून ते उंडाळकर गटाशी आघाडी करतील की स्वतंत्र लढतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Malkapur, 11 October : मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनुकूल असणाऱ्या प्रभागातील इच्छुकांची सोशल मीडियावर उमेदवारी जाहीर झाली आहे. काहींनी अन्य प्रभागात लढण्याची इच्छा व्यक्त केली. तब्बल २२ वर्षे सत्ता असलेल्या मलकापूर येथे प्रथमच भाजपला पोषक वातावरण असल्याने या पक्षात उमेदवारांची रस्सीखेच सुरू आहे, तर बालेकिल्ला असूनही काँग्रेसची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चार जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

निवडणुकीसाठी भाजपने (BJP) येथे जय्यत तयार केली आहे. त्यांच्याकडे उमेदवारांची संख्याही अधिक आहे. एका प्रभागात पाच ते सहा इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. काहींनी यापूर्वी स्वतःचे प्रभाग पिंजून काढले आहेत. लोकसंपर्कही वाढवला आहे. उमेदवारी मलाच मिळणार, असे छातीठोकपणे सांगत आहेत. आरक्षणानंतर स्वतःचे बॅनर सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. आगामी निवडणुकीला पाठिंबा द्या, अशी साद घातली जात आहे, त्यामुळे उमेदवारांची समजूत काढताना भाजपला कसरत करावी लागणार, हे मात्र नक्की.

निवडणूक जवळ येऊ लागेल, तसा सस्पेन्सही वाढत आहे. निवडणूक किती पक्षांत व किती गटांत, किती आघाड्यांमध्ये होणार? हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांची अद्याप कोणतीही ठाम भूमिका नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. निवडणुकीची तयारी केली. मात्र, काँग्रेस मलकापूर पालिकेची निवडणूक लढवणार की नाही? हे कार्यकर्त्यांनाही सांगता येत नसल्याची स्थिती आहे.

राष्ट्रवादीचे ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा येथे मोठा गट आहे. या गटाची भूमिका काय राहणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. हा गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार, की आघाडी करणार, की तटस्थ राहणार? याबाबत कार्यकर्त्यांना कल्पना नसल्याचे दिसून येते.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद यांनी काही झाले, तरी शिवसेना चार उमेदवारांना उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेनेने रणांगणात येण्यासाठी शड्डू ठोकला आहे. काँग्रेस व उंडाळकर गटाची चुप्पी आहे.

एका म्यानात, अनेक तलवारी

एकाच प्रभागात भाजपचे अनेक दिग्गज इच्छुक आहेत. त्यामुळे एका म्यानात अनेक तलवारी, अशी भाजपची अवस्था झाल्याने नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची? असा प्रश्न भाजपपुढे आहे. अनेक प्रभागांत भाजपचे तगडे उमेदवार असल्याने इच्छुकांना नाराज न करता त्यांची मनधरणी करताना भाजप नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार, हे नक्की.

शिंदेंनी अंग काढून घेतले

मलकापूर शहरात २२ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची सत्ता आहे. माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी काँग्रेसची सत्ता अबाधित ठेवली होती. काँग्रेसच्या माध्यमातून शहरात विकासकामे मार्गी लावली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत येथे भाजपने मुसंडी मारली, त्यामुळे याठिकाणी २२ वर्षांत पहिल्यांदाच काँग्रेस कमी पडली. शिंदे यांनी सहा महिन्यांपासून काँग्रेसच्या कार्यक्रमांतील सहभागही कमी, किंबहुना बंद केला आहे.

मलकापूरमध्ये उलथापालथ होणार

मनोहर शिंदे यांच्याकडे असणारे कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे तालुकाध्यक्षपदही नामदेव पाटील यांना दिले आहे. त्यामुळे शिंदे यांची भूमिका काय राहणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिंदे काँग्रेसच्या चिन्हावर लढणार, की उदयसिंह पाटील गटाबरोबर हातमिळवणी करत स्वतंत्र आघाडी करणार, की आणखी कोणता झेंडा हाती घेणार? याकडे लक्ष लागून आहे. त्यामुळे येथील राजकारणात उलथापालथ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

प्रश्न 1 : मलकापूर नगरपालिकेत सध्या कोणत्या पक्षाची सत्ता आहे?
काँग्रेसची, गेली २२ वर्षे.

प्रश्न 2 : सध्या सर्वाधिक उमेदवार कोणत्या पक्षात इच्छुक आहेत?
भाजपमध्ये, प्रत्येक प्रभागात ५-६ इच्छुक.

प्रश्न 3 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने किती उमेदवार देण्याची घोषणा केली?
चार उमेदवार.

प्रश्न 4 : माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे कोणत्या पक्षाशी जोडले आहेत?
ते काँग्रेसमधील असून सध्या त्यांच्या पुढील भूमिकेवर संभ्रम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT