Prashant Paricharak-Samadhan Autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Paricharak : तुतारीचा आग्रह धरणाऱ्या समर्थकांचा परिचारकांच्या भाजप उमेदवारीसाठी निरीक्षकांपुढे आटापिटा

Pandharpur-Mangalvedha Constituency : गेल्या काही दिवसांपासून प्रशांत परिचारक यांनी तुतारी हाती घ्यावी, यासाठी समर्थक परिचारक यांच्यावर दबाव आणत होते. मात्र, त्याच समर्थकांनी परिचारक यांना भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षनिरीक्षक आमदार महेश लांडगे यांच्यासमोर प्रयत्न केल्याचे दिसून आले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 October : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळावी, यासाठी भारतीय जनाता पक्षाच्या वतीने उमेदवार ठरविण्यासाठी इच्छुकांच्या नावावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मतदान घेण्यात आले. या मतदानात प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारीसाठी समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे पंढरपूर-मंगळेवढ्याच्या भाजप उमेदवारीसाठी शह-कटशहाचे राजकारण रंगणार असल्याचे स्पष्ट आहे.

विशेषतः गेल्या काही दिवसांपासून प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी तुतारी हाती घ्यावी, यासाठी समर्थक परिचारक यांच्यावर दबाव आणत होते. मात्र, त्याच समर्थकांनी परिचारक यांना भाजपची उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षनिरीक्षक आमदार महेश लांडगे यांच्यासमोर प्रयत्न केल्याचे दिसून आले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात निरीक्षक पाठवून इच्छुकांची माहिती घेतली जात आहे. इच्छुकांचे नाव निश्चित करण्यासाठी पदाधिकाऱ्यांचे गुप्त मतदान घेण्याची पद्धत भाजपने अवलंबली आहे.

यामध्ये प्रत्येक मतदारसंघातील तीन नावे सुचविण्याचे बंधन पक्ष पदाधिकाऱ्यांना असणार आहे. त्यानुसार पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून (Pandharpur-Mangalvedha) विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची नावे सुचवण्यासाठी मतदान घेण्यात आले.

पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. विशेषतः मागील काही महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कार्यकर्तेही मागे नव्हते, त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत परिचारक यांना उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार डावपेच आखले होते. त्यात भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील तब्बल 97 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या गुप्त मतदानामध्ये सहभाग घेतला. आवताडे आणि परिचारक गटाच्या काही लोकांनी केवळ आपल्याच नेत्यासमोर मतदान केल्याचे सांगण्यात येत आहे. एका मतदारसंघातून तीन नावे सुचवायची आहेत. मात्र, पंढरपूर-मंगळवेढ्यात आवताडे-परिचारक यांच्यातच उमेदवारीसाठी स्पर्धा आहे.

समाधान आवताडे-प्रशांत परिचारक या दोन नावातूनच पंढरपूरला-मंगळवेढ्याला भावी आमदार भेटण्याची शक्यता आहे. सध्या परिचारक यांच्यासह विद्यमान आमदार समाधान आवताडे हेही भाजपच्या उमेदवारीसाठी जोरदार तयारी करत आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात उमेदवारीचे दान टाकते, हे पाहावे लागणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT