Solapur, 25 July : सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर बाजार समितीसाठी ५४३१, तर बार्शी बाजार समितीसाठी एकूण ५०४१ मतदार आहेत. मतदार यादी अंतिम झाल्याने उपनिबंधक कार्यालयाकडून पणन विभागाकडे निवडणूक कार्यक्रम पाठविण्यात येणार आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बाजार समितीची निवडणूक होऊन कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळू शकते.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Solapur Bazar Samiti) ग्रामपंचायत गटाचे १,१७६, विविध कार्यकारी विकास सोसायटी गटातून १,२७६, व्यापारी गटातून : १,२७६, हमाल-तोलार गटातून १,०८४ असे एकूण ५,४३१ मतदार आहेत. बार्शी बाजार समितीसाठी (Barshi Bazar Samiti) ग्रामपंचायत गटातून १,०५६, विविध कार्यकारी विकास सोसायटी गटातून १,६६२, व्यापारी गटातून १,३११, हमाल-तोलार गटातून १,०११ असे एकूण ५,०४० मतदार असणार आहेत.
सोलापूर बाजार समितीच्या संचालकांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्या वेळी मुदतवाढ मिळावी, यासाठी बाजार समितीचे तत्कालीन सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रयत्न केले होते. मात्र, तिसऱ्या वेळी मुदतवाढ मिळू शकली नव्हती. त्यानंतर बाजार समितीवर पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशासकीय प्रशासक मंडळासाठी आमदार देशमुख यांनी केलेली शिफारस अद्याप मंजूर झालेली नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दोघांच्या नियुक्तीचा राज्याच्या अव्वर सचिवांनी काढलेल्या आदेशाला पणन विभागाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचे समजते, त्यामुळे बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ न आल्यास निवडणूक लागण्याची अधिक शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून बार्शी आणि सोलापूर बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम सहकार निवडणूक प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर सहकार प्राधिकरणाकडून तो निवडणूक कार्यक्रम आहे, तसाच स्वीकारला तर ऑगस्टमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया राबवून सप्टेंबरमध्ये म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बाजार समितीची निवडणूक होऊ शकतो.
विधानसभेपूर्वी बाजार समितीची निवडणूक होणार?
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारणपणे १५ सप्टेंबरनंतर कधीही जाहीर होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर व बार्शी या दोन्ही बाजार समित्यांची निवडणूक पार पडेल, अशा बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम असू शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.