Sharad Pawar-Dhairyasheel Mohite Patil-Dr. Babasaheb Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Constituency : पवारांचा आदेश म्हणत मोहिते पाटील उतरले डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या प्रचारात

Assembly Election 2024 : महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे देशमुखांच्या प्रचाराला कोण येणार, असा सवाल विचारला जात होता. त्यातच दीपक साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे पवार कोणाच्या पाठीशी उभे राहणार, याची उत्सुकता होती.

Vijaykumar Dudhale

Solapur, 14 November : महाविकास आघाडीत सांगोला विधानसभा मतदारसंघ अनपेक्षितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला आणि सर्वांचे अंदाज चुकले, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रमाणिक साथ देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या पदरी निराशा पटली.

ठाकरेंनी राष्ट्रवादीतून आलेले दीपक साळुंखे यांना मैदानात उतरविले, तर शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे एकटे पडलेले डॉ. बाबासाहेब देशमुख हे शेकापकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आता एकाकी लढाईत उतरलेले देशमुख यांच्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे सांगोल्याच्या रिंगणात उतरले असून आपण पवारांच्या आदेशानुसार प्रचाराला आल्याचे ते सांगत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघ (Sangola Constituency) विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला निश्चितपणे सुटेल, असा राजकीय निरीक्षकांचा होरा होता. पण, सर्वांचेच अंदाज चुकवत महाविकास आघाडीतील जागा वाटपात सांगोला मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला.

खरं तर सांगोला शेकापला (PWP) सुटावा, यासाठी बरेच प्रयत्न झाले. खुद्द पवारांकडूनही फिल्डिंग लावण्यात आली. पण त्यात यश आले नाही, त्यामुळे शेकापकडून बाबासाहेब देशमुख हे मैदानात उतरले आहेत.

खरं तर लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला प्रमाणिकपणे साथ दिली होती. पवारांच्या सांगण्यावरून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय डॉ. अनिकेत देशमुख यांनी घेत डॉ बाबासाहेबांच्या साथीने धैर्यशील मोहिते पाटील यांचे काम केले होते. त्यामुळे सांगोला आपल्याला सुटेल, असे सांगोल्याच्या देशमुखांचा होरा होता. पण सर्वांप्रमाणे त्यांचाही अंदाज चुकला.

महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे देशमुखांच्या प्रचाराला कोण येणार, असा सवाल विचारला जात होता. त्यातच दीपक साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी पवारांनी आपल्याला कामाला लागा, असे म्हटल्याचे सांगितले. त्यामुळे पवार कोणाच्या पाठीशी उभे राहणार, याची उत्सुकता होती.

लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची जाणीव ठेवून खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अखेर डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारात उतरले आहेत. गेली दोन दिवसांपासून ते देशमुख यांचा प्रचार करत आहेत. खासदार मोहिते पाटील यांनी बुधवारी दिवसभर सांगोल्यात तब्बल सात सभा घेतल्या, तर आजही त्यांनी बाबासाहेबांचा प्रचार केला आहे.

दुसरीकडे, सांगोल्यात पाय ठेवताच आपण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आदेशानुसारच डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आलो आहोत, असे सांगितले. डॉ. बाबासाहेबांच्या डोक्यावर पवारांचा हात आहे, त्यामुळे ते नक्की विधानसभेत जातील, असेही स्पष्ट केले आहे. देशमुख यांच्या पाठीशी पवार उभे राहिल्याचे सांगताना ज्या कुटुंबीयांच्या पाठीशी पवार आयुष्यभर उभे राहिले, त्यांनी अशा लोकांनी त्यांच्याशी गद्दारी करणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित करून त्यांनी दीपक साळुंखे यांच्यावर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT