Mumbai, 03 November : शेतकरी कामगार पक्षाबरोबर आमची चर्चा सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण आणि पनवेल या जागांवर त्यांच्याची चर्चा होऊ शकते. पण, सांगोल्याबाबत अजिबात चर्चा होणार नाही. आम्ही सांगोल्यातून अजिबात माघार घेणार नाही. कारण ती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीत असलेल्या शेतकरी कामगार पक्ष (PWP) आणि शिवसेना यांच्यात मागील २०१९ च्या निवडणुकीत लढत झाली हेाती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे शहाजी पाटील निवडून आले होते. शेकापचे अनिकेत देशमुख यांचा ७६८ मतांनी पराभव झाला होता. शिवसेनेतील फुटीत शहाजी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही (Shivsena UBT) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शेकापकडून डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी सांगोल्यावर चर्चाच होणार नाही, असे सांगितल्याने महाविकास आघाडीत बिघाडी अटळ मानली जात आहे.
संजय राऊत म्हणाले, सांगोल्याची शिवसेनेची विद्यमान जागा आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून आलेले असल्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार आहे. शेतकरी कामगार पक्षाबरोबर शनिवारीही आमची चर्चा झाली आहे. शेकापबरेाबर रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन जागांवर चर्चा होऊ शकते. सांगोल्यावर अजिबात चर्चाच होणार नाही. आम्ही सांगोल्यातून अजिबात माघार घेणार नाही.
शेतकरी कामगार पक्ष आमचा जुना सहकारी आहे. त्यांची काय भूमिका आहे, हे आम्ही समजून घेऊ. ते आमच्यासोबत कायम राहावेत, असे आम्हालाही वाटतं. रायगड जिल्हा आणि राज्यातील काही मतदारसंघात त्यांची चांगली ताकद आहे. महाविकास आघाडीतील आमचे ते जुने सहकारी असल्याने आम्ही त्यांचा आदर करतो. रायगड जिल्ह्यातील ज्या जागा त्यांना हव्या आहेत, त्या आम्ही द्यायला तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर दक्षिणमध्ये अमर पाटील महाविकासचे अधिकृत उमेदवार
सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेस पक्षाने कोणालाही अधिकृत एबी फार्म दिलेला नाही. त्यामुळे सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेनेचे अमर पाटील हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे, असेही खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.