Dr. Arun Adsul  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Politics : पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंना व्हायचंय आमदार; करमाळ्यातून रणशिंग फुंकले

Karmala Assembly Election : सर्वसामान्य कुटुंबातील एक नागरिक म्हणून राज्यघटनेच्या चौकटीत राहून करमाळ्यातील बंधू-भगिनींची सेवा करण्याची संधी मागणार आहे.

आण्णा काळे

Karmala News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी विधानसभेची 2024 ची निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी त्यांनी आपली जन्मभूमी करमाळ्याची निवड केली आहे. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे अद्याप ठरवलेले नाही. मात्र, करमाळ्यात निवडणूक लढविण्याचे निश्चित झाले आहे, असे डॉ. अडसूळ यांनी जाहीर केले आहे, त्यामुळे करमाळ्याच्या रणांगणात आमदारकीसाठी तुल्यबळ लढत बघायला मिळणार आहे. (Former Chancellor of Pune University Dr. Arun Adsul will contest assembly elections from Karmala)

माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ म्हणाले की, करमाळ्यातील युवकांच्या सुप्त ऊर्जेला योग्य दिशा देऊन तालुक्याचा विकास साधण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील एक नागरिक म्हणून राज्यघटनेच्या चौकटीत राहून करमाळ्यातील बंधू-भगिनींची सेवा करण्याची संधी मागणार आहे. मी माझ्या जन्मभूमीतील लोकांकडे सेवा करण्याची संधी मागितली नव्हती, असे होऊ नये म्हणून मी विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने ही संधी मागत आहे. त्यात कोणताही राजकीय हेतू नसणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तालुक्यातील मायबाप जनतेने मला सेवेची संधी दिली तर लोकप्रतिनिधीच्या भूमिकेचे ‘धर्मपालन’ करीत करमाळ्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. विशेषतः राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावेन. आपल्या तालुक्यातील जनतेकडे आपण सेवेची संधी मागितली नव्हती, ही खंत परतीच्या प्रवासात राहणार नाही, म्हणूनच मी करमाळ्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असेही डॉ. अडसूळ यांनी जाहीर केले.

करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय मी घेतला आहे. मात्र ही निवडणूक कोणत्या पक्षाकडून की अपक्ष लढवायची, हे अद्याप ठरवलेले नाही. त्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. मात्र, करमाळ्यातून आमदारकीची निवडणूक लढायचे, हे आता निश्चित आहे, असेही अडसूळ यांनी स्पष्ट केले.

करमाळा तालुक्यातील जनतेने प्रचलित राजकारण बदलण्याची वेळ आली आहे, हा संदेश मला संधी देऊन संपूर्ण महाराष्ट्राला द्यावा, असे आवाहन माजी कुलगुरू अरुण अडसूळ यांनी तालुक्यातील युवकांना आणि जनतेला केले आहे.

दरम्यान, माजी कुलगुरु डॉ. अरुण अडसूळ हे मूळचे करमाळ्याचे आहेत. करमाळा येथेच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले आहे. त्यांनी राज्य आणि देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे प्राचार्य म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे ते करमाळ्यात कोणत्या चिन्हावर लढणार, याची उत्सुकता आहे.

डॉ. अडसूळ यांनी पुण्यात भारती विद्यापीठात शिक्षक, प्राध्यापक, उपप्राचार्य अशा पदांवर २५ वर्षांहून अधिक काळ काम केले. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे प्राचार्य ते १५ वर्षे होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांनी संचालक विद्यार्थी कल्याण मंडळ, अध्यक्ष स्थायी समिती, कुलसचिव, उप-कुलगुरू, कुलगुरू अशा पदांवर प्रभावीपणे योगदान दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT