७३ व्या वर्षी पीएच.डी. – माजी शिक्षणमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी लेखनावर सहा वर्षांच्या अभ्यासानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली.
वयाला हरवणारी जिद्द – “शिक्षणाला वय नसते” हे दाखवत त्यांनी चार वर्षांत पूर्ण होणारा अभ्यास विरोधकांमुळे दोन वर्षे वाढून सहा वर्षांत पूर्ण केला.
मिश्किल प्रतिक्रिया – समारंभानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वतःच्या वयाचा, माध्यमांचे लक्ष आणि राजकारणातील अडथळ्यांचा उल्लेख केला.
Solapur, 18 September : शिक्षणाला आणि प्रेमाला वय नसते, असे म्हणतात. माणूस हा शेवटच्या क्षणापर्यंत शिकत असतो. अगदी त्याच उक्तीचा प्रत्यय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात आला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सहकारी, माजी शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी पीएच. डी. मिळविली. खुद्द पक्षाचे अध्यक्ष पवारच या वयातही पायाला भिंगरी लावून राज्यात फिरत असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे अनुयायीही मार्गक्रमण करत असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) पदवी प्रदान समारंभानंतर माध्यमांशी बोलताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माध्यमाला भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. ‘वय झालेल्या अभिनेत्रीकडे आपले लक्ष गेले, त्याबद्दलही माध्यमांचे आभार मानतो,’ अशी आपल्या मिश्किल शैलीत ढोबळेंनी टिपण्णी केली आहे.
लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) म्हणाले, शिक्षणाला वय असत नाही. शाहू शिक्षण संस्थेचा संस्थापक म्हणून अभ्यास करणाऱ्या स्नातकाला आपण आपल्या कृतीतून आदर्श निर्माण केला पाहिजे, या हेतूने प्रथम कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर सोलापूर विद्यापीठात पीएचडीसाठी रजिस्ट्रेशन केले.
शाहू शिक्षण संस्थेचे जवळपास एक हजार कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सोलापूर जिल्हा आणि राज्यभरातून माझ्या ज्ञानार्जनाचा गौरव झाला. याबाबत सर्वांचे आभार मानतो. विशेषतः प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आणि वय झालेल्या अभिनेत्रीकडे आपलेही लक्ष गेले, त्याबद्दलही आभार मानतो, असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी लेखनाची वैशिष्ट्ये असा माझा पीएचडीचा विषय होता. त्यावर पीएचडी मिळविण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी गेला. खरं तर चार वर्षांत मला पीएचडीचा अभ्यास पूर्ण करता आला असता पण काही विरोधकांच्या प्रेमाखातर दोन वर्षे वादात अधिक गेली.
पावसाचं पडलेलं पाणी, डोहात जमा झालेले पाणी, हे खड्ड्याला झाकून ठेवतं. कदाचित राजकारणी माणसाला त्यात अडखळावं लागतं. हे गृहीत धरूनच पीएचडीची चार वर्षांची वाढून दोन सहा वर्षे झाली, असेही ढोबळे यांनी नमूद केले.
ढोबळे म्हणाले, टोकदार अक्षराची संगत करणं, शारदेच्या दरबारात मानाचा मुजरा करीत उभं राहणं आणि दरबारी थाटात देखण्या अक्षराशी संगत करणं, हा माणसाचा स्थायीभाव असतो. त्या माध्यमातूनच मला संधी मिळाली आणि मी अभ्यास करत गेलो, त्यामुळे माझ्या कामाला अधिक गती मिळाली.
खरं सांगायचं तर वेदांताचे सिद्धांत मांडून मधांध झालेल्या जात्याधांना आवरायचे असेल, तर बाबासाहेबांचे नाव घेऊन तर टोकदार शिक्षणाची संगत करणं, काळा कोट घालून कोर्टात उभं राहणं आणि माजलेल्या माजुरी बैलाला जागेवर थांबवणे, हेच घटनेचे परमकर्तव्य आहे. ते आम्ही सगळेजण मिळून करतो आहोत, असा दावाही ढोबळे म्हणाले.
प्र.1: लक्ष्मण ढोबळे यांचा पीएच.डी. विषय कोणता होता?
उ. – अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी लेखनाची वैशिष्ट्ये.
प्र.2: त्यांना पीएच.डी. पूर्ण करण्यास किती वेळ लागला?
उ. – एकूण सहा वर्षे, विरोधकांमुळे दोन वर्षे जास्त लागली.
प्र.3: त्यांनी कोणत्या विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली?
उ. – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून.
प्र.4: त्यांनी शिक्षणाबाबत कोणता संदेश दिला?
उ. – शिक्षणाला आणि ज्ञानार्जनाला वयाची अट नसते, आयुष्यभर शिकत राहावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.