Solapur News : माजी आमदार दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरवलं आहे. पण, पक्ष कोणता याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले माने यांनी मला तुमच्याशी बोलायचंय म्हणत कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. संघर्षाला घाबरतंय कोण? म्हणत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे, त्यासाठी मी जो निर्णय घेईन, तो तुमच्या हिताचा आणि सर्वांना विश्वासात घेऊन करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Former MLA Dilip Mane blew the election trumpet)
माजी आमदार दिलीप माने यांनी मागील निवडणूक सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. मात्र, त्यात त्यांना अपयश आले होते. त्यानंतर माने हे शिवसेनेपासून चार हात लांब आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ गेले होते. थेट अजित पवार आणि शरद पवार यांच्याशी त्यांचा कनेक्ट हेाता. मात्र, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी काहींशी तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसून येत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, पक्ष कोणता हे सांगितले नव्हते. आताही त्यांची तीच भूमिका दिसत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणुकीत संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र, तो संषर्घ कोणत्या पक्षाच्या माध्यमातून उभारणार हे स्पष्ट केले नाही. तसंही माने यांच्यासमोर मोजकेच पर्याय आहेत. कारण दक्षिण सोलापूरमधून भाजपचे सुभाष देशमुख आमदार आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटणार हे निश्चित आहे. महाविकास आघाडीत मागील वेळी तो काँग्रेसकडे होता. मात्र, काँग्रेस नेत्यांशी त्यांचे किती सूत जुळते, हे सर्वज्ञात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तो मतदारसंघ सोडवून घ्यायचा, हा एक सक्षम पर्याय त्यांच्यासमोर असू शकतो.
दुसरीकडे, मध्यंतरी एक माजी आमदार भारत राष्ट्र समितीच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. मात्र, बीआरएसचा तेलंगणामध्येच पराभव झाल्याने त्यांचा महाराष्ट्रातील जोर ओसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माने यांच्यासाठी बीआरएसचाही पर्याय तितकसा सक्षम दिसत नाही. एकतर काँग्रेस नेतृत्वाशी जुळवून घेत दक्षिणमध्ये सेफ गेम माने यांच्याकडून खेळला जाऊ शकतो. कारण काँग्रेसलाही लोकसभेसाठी स्ट्राँग नेत्याची मदत लागू शकते, त्यामुळे लोकसभेला मदत करण्याच्या बदल्यात विधानसभेची दक्षिणची उमेदवारी असे गणित जुळू शकते.
दरम्यान, दिलीप माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. त्यात ते म्हणतात की, वाट आहे संघर्षाची...म्हणून थांबणार कोण? मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं हे तर रक्तातच...! तुमच्या जीवाभावाचा, आपल्यातला माणूस, स्वाभिमान जागृत करणारा, ‘लोकप्रतिनिधी’ तुम्ही निर्माण केला. ‘आमदार’ म्हणून पाहिलाय. या काळात मी जोडलेले आपण सर्व लोक सदैव माझ्यासोबत आहात, याचा सार्थ अभिमान आहे.
आपल्या सर्वांची साथ, हाच माझा विश्वास! ही साथ कायमची हवी. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने २००९ ला आमदार झालो. राजकारणात होणाऱ्या घडामोडींमुळे विकास कामे करताना खूप अडचणी आल्या. त्यातून माझ्या परिने मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. आपल्याशी गाठीभेटीसुद्धा होत होत्या. मात्र, एकत्रित असा भेटण्याचा अन आपल्याशी थेट बोलण्याचा व संवाद साधण्याचा योग येत नव्हता. तो या ग्रुपच्या माध्यमातून येताना दिसत आहे. आपण बहुसंख्येने सहभागी झालात आपले प्रेम अनुभवले. कोणत्याही, ‘नेत्याला’ जेवढे प्रेम मिळत नसेल, तेवढे प्रेम मला आपल्याकडून मिळत आहे, याचे मला समाधान वाटले, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
आजही मी रणांगणातच आहे. हे रण रखरखतं आहे. माझ्या मनात किंचितही अहंकार नाही, वा गर्व ही नाही. सामान्य जनतेची साथ, हाच माझा विश्वास आणि ही साथ कायमची हवी आहे. तुम्हाला काळजी करायचं कारण नाही; कारण तुमच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. कोणीही नाराज होऊ नका आणि डगमगूही नका. मी जो निर्णय घेईन, तो सर्वांच्या हिताचा असेल. माझा कोणताही निर्णय तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊनच होईल. तुम्ही सर्वजण एकजुटीने पाठिशी असल्याने मी लढाई लढणार व जिंकणारच... असा विश्वासही माजी आमदार माने यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.