Sangola News : टेंभूचे पाणी सांगोला तालुक्यातील माण नदीत आल्यामुळे माझे स्वप्न साकार झाले आहे. टेंभूच्या पाण्यामुळे माण नदीकाठावरील शेतकऱ्यांसाठी सोनियाचा दिवस उगवला आहे. पण, आमचे विरोधक आजही गणितं मांडत आहेत. गणित समजून घ्यायचे असेल तर माझ्याकडे या. तुमच्या आजोबाला जे जमलं नाही, ते तुम्हाला कुठं जमायचं. नादाला लागू नका, आमचं आम्ही गणित करतो, अशा शब्दांत आमदार शहाजी पाटील यांनी माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू आणि शेकापला आव्हान दिलं. (What can you do that your grandfather could not do : Shahaji Patil)
सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना १ टीएमसी आणि माण नदीवरील सर्व १६ बंधारे वर्षातून तीन वेळा भरण्यासाठी ०.६०० एमसीएफटी असे एकूण १.६०० टीएमसी पाणी नव्याने मंजूर केल्याबद्दल वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. त्या समारंभात बोलताना शहाजीबापूंनी शेकापला आव्हान दिलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार पाटील म्हणाले, की सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी चळवळ उभी करून आम्ही संघर्ष केला. विविध पातळ्यांवर आंदोलनं केली. अगदी जनावरे घेऊन उपोषणं केली. त्यामुळे आज कुठेतरी टेंभूचे पाणी सांगोला तालुक्याला मिळायला लागले आहे. माण नदीवरील सर्व १६ बंधारे वर्षातून तीन वेळा भरण्यात येणार आहेत. तसेच वंचित १९ गावांनाही आता पाणी मिळणार असल्याने तालुक्यासाठी आज सोनियाचा दिवस आहे.
सांगोल्याला आता पाण्यासाठी संघर्ष करण्याची गरज नाही. आपल्या हक्काचं पाणी तालुक्याला मिळणारच आहे. तुम्ही कोणतीही काळजी करू नका. विरोधक मात्र पुन्हा गणितं मांडत आहेत. पण, त्यांच्या आजोबांना जे जमलं नाही, ते त्यांना कुठून जमायचं. आम्ही आमचं गणित करतो. पण, माण नदीचा तळ तुम्हाला दिसू देणार नाही, असा शब्द मी आणि दीपक साळुंखे देतो, असेही शहाजी पाटील यांनी स्पष्ट केले.
राजकारणाच्याबाबतीत आमच्या नादाला लागू नका. मी दीपक साळुंखेंचे शंभर वेळा आभार मानतो. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आमदार झाल्याने सांगोला तालुक्यासाठी पाणी आणू शकलो आहे. तालुक्याचा दुष्काळ हटण्यास मदत झाली आहे, अशी कबुलीही शहाजी पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे म्हणाले की, (कै.) काकासाहेब साळुंखे यांच्या माध्यमातून पाण्याची खरी सुरुवात १९७२ पासून सुरू झाली. काळाने त्यांना लवकरच हिरावून नेले. पण, गेल्या पाच वर्षांत तालुक्याच्या विकासाला गती आली आहे. विकासकामांबाबत मी आणि शहाजी पाटील दोघे मिळून निर्णय घेतो, त्यानंतर सरकारदरबारी पाठपुरावा करतो.
तालुक्यातील विकासकामांसाठी जेवढी पत्रं सरकारला दिली, त्यावेळी शहाजीबापू एकदाही रिकाम्या हाताने आलेले नाहीत. आम्ही सर्वकाही मंजूर करून आणले आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरण्याची मानसिकता ठेवून पाण्याची वहिवाट चालू ठेवावी. आम्ही आणून देण्याचे काम केले आहे, ते पुढे चालू ठेवण्याचे काम तुमचे आहे, असेही साळुंखे यांनी सांगितले.
या वेळी भाजपचे विजय बाबर, प्रा. संजय देशमुख, संभाजी आलदर, विजय शिंदे यांची भाषणे झाली. विकास पवार यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर बाबूराव गायकवाड, तानाजी पाटील, सुभाष इंगोले, किरण पवार, सागर पाटील, दादासाहेब लवटे, आनंद घोंगडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.